गुरूवार ठरला अपघात वार : चार वेगवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू तर ४ जण गंभीर जखमी

पहूर,ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात चार वेगवेगळ्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. गुरूवार जणू काही अपघात वार ठरल्याचे दिसून आले. तर चार जखमी झाल्याची घटना घडली आहे. यात सोनाळा फाट्याजवळ रस्त्यावर वाळत टाकलेल्या मक्क्यावरून दुचाकी घसरून टेम्पो वाहनावर आदळल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले तर दोन जखमी झाले. दुसऱ्या घटनेत आयशरच्या धडक दिल्यान टेम्पोचालकाचा मृत्यू झाला तर तिसऱ्या घटनेत सोनाळा फाट्याजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना जळगावात दाखल करण्यात आले.तर चौथ्या घटनेत ट्रॅक्टरच्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

1. टेम्पोची दुचाकीला धडक; दोन ठार, दोन जखमी

जामनेर तालुक्यातील शिवना येथून भुसावळकडे बाजाराचा माल घेऊन जाणाऱ्या मालवाहू टेम्पोची सोनाळा शिवारात मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास (एम.एच. २० डी. ई. ४३१३) समोरून पहूरकडे येणाऱ्या दुचाकीला (एम.एच. १९ बीआर २१२६) रस्त्यावर वाळत टाकलेल्या मक्क्यावर घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मयूर गणेश चौधरी (वय-२५) रा. शेंदूर्णी व शंकर भगवान चौधरी (वय-३५) रा. धुळे हे दोघे जागीच ठार झाले .दुचाकीवरील मयूर देवेंद्र गोढरी हे जखमी झाले. तसेच टेम्पो चालक शेख सलिम शेख याकूब (रा. शिवना, ता. सिल्लोड) यांची ही प्रकृती चिंताजनक असून या अपघातातील दोघांना पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारार्थ त्यांना जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी रघुनाथ चौधरी रा. शेंदूर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहेत.

2. आयशरच्या धडकेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पाळधीनजीकची घटना

अजिंठा येथून दुरुस्तीसाठी जळगाव येथे गेलेली टाटा ४०७ (एमएच ०४ डीके ३१९३) दुरुस्त होऊन पहूरकडे येत असताना आज मध्यरात्री पाळधी नजिक नादुरुस्त झाली. वाहन चालक कलीम शेख मोहम्मद हे वाहन नादुरुस्त झाल्याने खाली उतरले. त्यांचा मुलगा शेख तौसिफ व कारागीर हाकिम शेख सरदार हे देखील खाली उतरून गाडीतील बिघाड पाहत असतानाच जळगाव कडून भरधाव वेगात येणाऱ्या आयशरने (एमएच १८ एए ७६०७) मागून दिलेल्या जबर धडकेत टेम्पो चालक कलीम शेख रस्त्यावर फेकल्या गेले. त्यांना तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . डॉ. मयुरी पवार यांनी तपासणी अंती त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

3. कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

पहूर वाकी रस्त्यावरील सोनाळा फाट्याजवळ दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्कार्पिओ (एमएच ३९ डी २५४५) आणि यामाहा (एमएच १६ डीजे ३०९९) यांच्यात समारोसमोर झालेल्या धडकेत दुचाकी स्वार राहुल नागो तेली व शिवा शंकर सरताळे रा. वाकी हे दोघे गंभीर जखमे झाले असून त्यांना जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

4. ट्रॅक्टर अपघातात तरूण ठार

ट्रॅक्टर अपघातात सलाउद्दीन शेख जैनुद्दीन (वय- ३२) रा. शेंदुर्णी हे ही जागीच ठार झाले असून याप्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे .

Protected Content