Home Cities जळगाव जागतिक पुस्तक दिनानिमित्त तीन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन उत्साहात 

जागतिक पुस्तक दिनानिमित्त तीन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन उत्साहात 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक पुस्तक दिनानिमित्त जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीच्या वतीने अभियंता भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमाला ग्रंथप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. साहित्य, वाचन संस्कृती आणि ज्ञानवर्धन यांचा संगम घडवणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता इंजिनिअर राजेश मोरे, कवी अशोक कोतवाल, रंगकर्मी मंजुषा भिडे तसेच वाचक व समीक्षक लीना लेले यांची उपस्थिती होती. याशिवाय जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीचे चेअरमन पी. एम. पाटील आणि साहेबराव पाटील यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व अधोरेखित करत वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन केले. आधुनिक युगात डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचनाची सवय कमी होत असल्याची खंत व्यक्त करत पुस्तकांचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे ज्ञान यावर भर देण्यात आला. विविध वक्त्यांनी आपल्या मनोगतातून साहित्य, संस्कृती आणि समाज यांचा परस्पर संबंध उलगडून सांगितला.

या प्रसंगी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा संचालक आयआरडीएसएस एकनाथ चौधरी यांच्या ‘आहार हेच गुणकारी औषध’, ‘ज्येष्ठ नागरिक आणि आजार’ तसेच ‘मधुमेह आहार आणि नियंत्रणाच्या शास्त्रोक्त पद्धती’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकांमधून आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभियंता भवनमधील राजेंद्र पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला वाचकप्रेमी आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन साहेबराव पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले.


Protected Content

Play sound