Home Cities जळगाव मनपाचा दणका: मानराज पार्क ते खोटे नगर परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!

मनपाचा दणका: मानराज पार्क ते खोटे नगर परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मानराज पार्क ते खोटे नगर परिसरातील समांतर रस्त्यांवर थाटलेली अतिक्रमणे आज जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीनदोस्त केली. शुक्रवारी (२४ एप्रिल) सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या या कारवाईने परिसरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले. गेल्या दोन आठवड्यांपासून महापालिकेने शहरातील मुख्य मार्गावरील रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

आज सकाळी मनपाचे पथक जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या ताफ्यासह मानराज पार्क ते खोटे नगर भागात दाखल झाले. रहदारीला अडथळा ठरणारी दुकाने, हातगाड्या, टपरी आणि रस्त्यावर अनधिकृतपणे उभी असलेली वाहने पथकाने जप्त केली. कारवाई सुरू असताना एका महिलेने पथकाशी जोरदार हुज्जत घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मनपा कर्मचाऱ्यांनी आपली कारवाई न थांबवता परिस्थिती हाताळली.

गेल्या पंधरा दिवसांपासून मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक शहरातील महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे काम सातत्याने करत आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आजच्या कारवाईमुळे संबंधित भागात एकच खळबळ उडाली होती.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शहरातील रस्ते नागरिकांच्या सोयीसाठी आहेत, त्यामुळे त्यावर झालेले अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. ज्या भागात अद्याप अतिक्रमणे आहेत, त्यांनी ती तातडीने स्वतःहून काढून घ्यावीत. अन्यथा, मनपाद्वारे ही अतिक्रमणे काढून ती जप्त केली जातील आणि संबंधित धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे. आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा मानस महापालिकेने व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound