Home Cities यावल यावल पंचायत समितीत सीईओ करिष्मा नायर यांचा धडक आढावा; अधिकाऱ्यांना फटकार

यावल पंचायत समितीत सीईओ करिष्मा नायर यांचा धडक आढावा; अधिकाऱ्यांना फटकार


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी विविध विकासकामांचा धडक आढावा घेत प्रशासनाला चांगलेच झटके दिले. प्रलंबित कामे, कामातील ढिलाई आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या यावर तीव्र नाराजी व्यक्त करत “कामात कसूर चालणार नाही” असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पंचायत समितीतील बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

पंचायत समितीत झालेल्या या बैठकीस गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, घरकुल तसेच आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाकडून सुरू असलेल्या योजनांची माहिती घेताना करिष्मा नायर यांनी अनेक प्रलंबित विकासकामांबाबत नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी कामांच्या अंमलबजावणीत झालेला विलंब आणि अपूर्ण प्रकल्पांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

बैठकीदरम्यान नागरिकांच्या समस्या आणि तालुक्यातील विकासकामांच्या गतीबाबतही सविस्तर चर्चा झाली. विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेताना कामकाजात गती आणण्यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या. योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे न झाल्यास जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बैठकीनंतर पत्रकारांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील गोंधळ आणि कथित घोटाळ्यांबाबत तसेच किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्यांबाबत माहिती दिल्यानंतर सीईओ करिष्मा नायर यांनी तात्काळ दखल घेत किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट दिली. या अचानक भेटीमुळे आरोग्य विभागातही खळबळ उडाली.

प्रत्यक्ष पाहणीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र अपुऱ्या जागेमुळे ग्रामीण रुग्णालयातील पी.एम. रूममध्ये चालवावे लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले. बंद अवस्थेत पडलेल्या रुग्णवाहीकेबाबतही त्यांनी माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. तरन्नूम शेख यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची गंभीर दखल घेण्यात आली.

“रुग्णांना योग्य सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट करत प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव लवकरच योग्य ठिकाणी हलविण्याचे आश्वासन करिष्मा नायर यांनी दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे आरोग्य सेवा सुधारण्याबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाली आहे.

या धडक आढावा बैठकीमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित विभागांना आता कामात वेग आणावा लागणार आहे. विशेषतः विकासकामे आणि आरोग्य सुविधांबाबत प्रशासन अधिक उत्तरदायी होण्याची चिन्हे दिसत आहेत.


Protected Content

Play sound