Home Cities जळगाव जळगावात ‘भारताची प्रतिभा’ अभिवाचनातून वाचन संस्कृतीला चालना

जळगावात ‘भारताची प्रतिभा’ अभिवाचनातून वाचन संस्कृतीला चालना


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक पुस्तक दिनानिमित्त जळगावात आयोजित विशेष कार्यक्रमात वाचन संस्कृतीच्या जपणुकीचा संदेश देत ‘बुके ऐवजी बुक’ ही संकल्पना समाजात रुजवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार राजूमामा भोळे यांनी केले. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे वाचनाची सवय कमी होत असली तरी पुस्तकेच व्यक्तिमत्त्व घडवणारी खरी साधने आहेत, असे त्यांनी नमूद केले.

ग्रामगौरव प्रकाशन आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौकात ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकातील निवडक लेखांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजूमामा भोळे होते. कार्यक्रमाला पुस्तकाचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, ग्रामगौरवचे संस्थापक विवेक ठाकरे, जळगाव जिल्हा बँकेचे एलडीएम सुनील डोहरे, जैन उद्योग समूहाचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, रोटरी क्लबचे सचिव अॅड. अभय कुलकर्णी, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शितल साळी, रत्नाकर पाटील आणि डॉ. पूजा वाघ यांची उपस्थिती होती.

या अभिवाचन कार्यक्रमात ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकातील माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या जीवनावर आधारित लेखांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. निसर्गकवी पद्मश्री ना. धो. महानोर यांनी लिहिलेल्या लेखाचे अभिवाचन प्रा. रामचंद्र पाटील यांनी केले, तर श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या कन्या सौ. ज्योती राठोर यांच्या ‘माझी आई… ताई’ या भावनिक लेखाचे अभिवाचन प्रसिद्ध निवेदिका अपूर्वा पुष्कराज वाणी यांनी केले. या अभिवाचनामुळे उपस्थितांच्या मनात प्रतिभाताई पाटील यांच्या कार्याच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपादक सुरेश उज्जैनवाल यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामगौरवच्या कार्यकारी संपादिका तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटीच्या अध्यक्षा कु. धनश्री ठाकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिनेश थोरात यांनी मांडले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधुरी थोरात, अरुण इंगळे, गौरव रणदिवे, हर्षल सोनवणे, सौ. दीपा बानाईत, सुभाष मराठे, श्रुती मोरे आणि प्रतीक वरयानी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित वाचकांना ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकाचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे वाचनाची प्रेरणा अधिक दृढ झाली.


Protected Content

Play sound