जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात शुक्रवारी सकाळी १० वाजता वाहतूक पोलिसांनी एक धडक कारवाई करत नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांना जोरदार दणका दिला. शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून, याचाच भाग म्हणून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर आणि नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट्सवर थेट ‘बुलडोझर’ फिरवण्यात आला. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहर वाहतूक शाखेने हेल्मेटचा वापर न करणे, अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास प्रोत्साहन देणे, रहदारीस अडथळा निर्माण करणे आणि कर्कश सायलेन्सरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण याविरुद्ध कडक पवित्रा घेतला आहे. रस्त्यावरील वाढत्या अपघातांची मालिका पाहता, ही कारवाई अधिक कठोर करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यात दुचाकी अपघातांमध्ये तब्बल ४५० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला कठोर निर्णय घेणे भाग पडले आहे. जिल्हा रस्ते व सुरक्षा समितीच्या आदेशानुसार, या मोहिमेला अधिक गती देण्यात आली आहे.
कारवाई सुरूच राहणार : पोलीस प्रशासन
“रस्त्यावरील बेशिस्तपणा आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन हे अपघातांना निमंत्रण देणारे आहे. गेल्या वर्षभरात ४५० हून अधिक बळी गेल्यानंतरही जर वाहनधारक सुधारणार नसतील, तर अशा प्रकारे कडक कारवाई करणे आता अपरिहार्य बनले आहे. ही मोहीम भविष्यातही अशीच सातत्याने सुरू राहील.” अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड दिली.
वाहतूक शाखेच्या या धडक कारवाईमुळे नियम तोडणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आता या कारवाईनंतर तरी बेशिस्त वाहनधारक नियमांचे पालन करतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



