Home Cities जळगाव जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा; दिशा जैनचा विशेष गौरव

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा; दिशा जैनचा विशेष गौरव


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वाचन संस्कृतीला चालना देणे आणि विद्यार्थिनींमध्ये पुस्तकांविषयी प्रेम निर्माण करणे या उद्देशाने आयोजित या उपक्रमात ज्ञान, वाचन आणि पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. कविता शितल कुमार देशमुख यांच्या हस्ते ग्रंथालय शास्त्राचे जनक मानले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ज्ञानसाधनेत पुस्तकांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, यावर मार्गदर्शन करत विद्यार्थिनींना वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहन करण्यात आले.

महाविद्यालयाच्या ग्रंथपाल कविता राहुल भोरटके यांनी जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व, इतिहास आणि वाचनाचे आयुष्यातील स्थान याबाबत विद्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली. पुस्तक हे केवळ ज्ञानाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, विचारांची समृद्धी आणि जीवनमूल्यांची जपणूक करणारे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित वाचनातून बौद्धिक विकासासोबतच सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, असेही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी विद्यार्थिनींना वाचन संस्कृतीचा संदेश देतानाच वर्षभरात सर्वाधिक पुस्तक वाचन करणाऱ्या तृतीय वर्ष बीएस्सीच्या विद्यार्थिनी दिशा जैन हिचा ग्रंथालयातर्फे विशेष गौरव करण्यात आला. तिला पेन आणि पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तिच्या गौरवामुळे इतर विद्यार्थिनींनाही वाचनाची प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमादरम्यान ग्रंथालयाचा उपयोग अधिक प्रभावीपणे कसा करता येईल, याबाबतही विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात आला. डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व अबाधित असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. पुस्तक हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित नसून जीवन समृद्ध करणारे माध्यम आहे, हा विचार या उपक्रमातून अधोरेखित झाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मीनल राणे, एनएसएस को-ऑर्डिनेटर प्रो. जयश्री कुलकर्णी, प्रो. हिमानी जमाले तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये वाचनाबद्दल नव्याने उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून आले.

 


Protected Content

Play sound