Home Cities जळगाव दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणीचा उत्साह ; ३ दिवसांत १५ जोडपी विवाहबंधनात

दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणीचा उत्साह ; ३ दिवसांत १५ जोडपी विवाहबंधनात


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला असून, कार्यालयाच्या आवारात सर्वत्र शांतता आणि शुकशुकाट पसरला आहे. मात्र, याच काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र पूर्णपणे वेगळे आणि उत्साही चित्र पाहायला मिळत आहे. येथे विवाह नोंदणीसाठी येणाऱ्या प्रेमीयुगुलांची मोठी लगबग दिसून येत आहे.

शासकीय कर्मचारी संपावर गेल्यामुळे दैनंदिन कामकाज ठप्प झाले असताना, दुय्यम निबंधक अधिकारी जी.पी. राठोड यांनी प्रसंगावधान राखत आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने विवाह नोंदणीची प्रक्रिया कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू ठेवली आहे. या विशेष नियोजनाचा सकारात्मक परिणाम म्हणजे, गेल्या अवघ्या तीन दिवसांत तब्बल १५ जोडप्यांनी कार्यालयात हजेरी लावून आपल्या विवाह नोंदणीची कायदेशीर प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात संपाच्या पार्श्वभूमीवर सन्नाटा पसरला आहे, तर दुसरीकडे विवाह नोंदणीसाठी आलेल्या जोडप्यांसह त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमुळे दुय्यम निबंधक कार्यालयाचा परिसर दिवसभर गजबजलेला दिसत आहे. विवाह नोंदणी ही एक अत्यावश्यक सेवा असल्याने, संपाच्या काळातही ती थांबली नसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने, अधिकारी जी.पी. राठोड यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या गजबजलेल्या वातावरणाने जिल्हाधिकारी कार्यालयातील शांततेच्या पार्श्वभूमीवर एका वेगळ्याच उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. सध्या संपामुळे सर्वत्र शांतता असली तरी, दुय्यम निबंधक कार्यालयातील ही धडपड नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.


Protected Content

Play sound