Home Cities जळगाव जळगावात आजपासून ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

जळगावात आजपासून ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उन्हाळी सुट्टीत बालकांच्या मनोरंजनासोबत संस्कार, प्रबोधन आणि कुटुंबासोबत आनंददायी अनुभव देणारा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव आजपासून जळगावात रंगणार आहे. अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा तीन दिवसीय महोत्सव २४, २५ आणि २६ एप्रिल रोजी शहरातील भाऊंचे उद्यान येथील एम्फी थिएटरमध्ये पार पडणार आहे.

परीक्षा संपल्यानंतर लागणाऱ्या सुट्टीचा सदुपयोग करत बालकांना जागतिक दर्जाचे, आशयघन आणि प्रबोधनात्मक चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे. केवळ मुलांसाठीच नव्हे, तर पालकांनाही आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देणारा हा महोत्सव ठरणार असल्याने याविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

दररोज सायंकाळी ६.३० वाजता सुरू होणाऱ्या या महोत्सवात डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या बालकांना दर्जेदार चित्रपटांचे वेगळे विश्व अनुभवता येणार आहे. मनोरंजनासोबत विचारप्रवर्तक आशय, संस्कारमूल्ये आणि सर्जनशीलतेचा संगम असलेले चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत.

या महोत्सवाचे उद्घाटन २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते होणार असून, या उपक्रमामुळे शहरातील सांस्कृतिक वातावरणात नवे रंग भरले जाणार आहेत. विशेष म्हणजे, या महोत्सवास प्रवेश पूर्णतः विनामूल्य ठेवण्यात आल्याने अधिकाधिक बालक-पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आयोजकांच्या मते, चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून शिक्षण, प्रबोधन आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन आहे. चांगल्या चित्रपटांच्या माध्यमातून मुलांमध्ये कल्पनाशक्ती, संवेदनशीलता आणि सकारात्मक विचारांची जडणघडण होते. त्यामुळे हा महोत्सव बालमन समृद्ध करणारा उपक्रम ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशनच्या या संयुक्त उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून, जळगावमध्ये बालचित्रपट संस्कृतीला चालना देण्याचा हा प्रयत्न स्तुत्य मानला जात आहे. पालक आणि मुलांमध्ये संवाद वाढवणारा आणि एकत्रित अनुभव देणारा हा महोत्सव विशेष ठरणार आहे.


Protected Content

Play sound