Home राजकीय विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांच्या नावाची जोरदार चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह !

विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांच्या नावाची जोरदार चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह !


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ व धुरंधर नेते नंदकिशोर महाजन यांचे नाव सध्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. महाजन यांची अढळ पक्षनिष्ठा, सर्वसामान्यांशी असलेला दांडगा जनसंपर्क आणि विकासकामांचा धडाका यामुळे त्यांच्या नावाचा विचार पक्षाकडून उच्चपातळीवर होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या वृत्ताने रावेर, यावल आणि मुक्ताईनगर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

तांदलवाडी गावच्या मातीतून आलेले नंदकिशोर महाजन हे सुरुवातीपासूनच भाजपचे निष्ठावान शिलेदार म्हणून ओळखले जातात. केवळ निवडणुकीपुरते सक्रिय न राहता, २४ तास लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहण्याची त्यांची कार्यपद्धती त्यांना इतरांपासून वेगळी ठरवते. शेतकरी, कष्टकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेषतः कोरोना संकटकाळात त्यांनी जीवाची पर्वा न करता गरजूंना धान्य आणि वैद्यकीय मदत पुरवली, ज्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. रावेर पंचायत समितीचे दोनवेळा सदस्य व सभापती, जिल्हा बँकेचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. “नंदकिशोर महाजन यांना संधी मिळाल्यास रावेरसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला खऱ्या अर्थाने नवी गती मिळेल,” अशी खात्री स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, एक अभ्यासू आणि लोकप्रतिनिधी म्हणून नंदकिशोर महाजन विधान परिषदेत एक प्रबळ चेहरा ठरू शकतात, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound