Home Cities जळगाव आमदार खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोन नव्हे, प्रशिक्षित विमान! चौकशीत सत्य उघड

आमदार खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोन नव्हे, प्रशिक्षित विमान! चौकशीत सत्य उघड

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी करण्यात आल्याच्या तक्रारीची जळगाव जिल्हा पोलीस दलाने चौकशी केली. या चौकशीत संबंधित दृश्य ड्रोनचे नसून प्रशिक्षण विमानाचे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

एकनाथराव खडसे यांनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात याबाबत अर्ज दिला होता. २८ जून २०२६ रोजी रात्री ७.५० ते ८.१५ वाजेदरम्यान फार्महाऊस परिसरात अज्ञात व्यक्तीकडून ड्रोनद्वारे रेकी किंवा चित्रीकरण करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण आणि जळगाव विमानतळावरील विमान प्रशिक्षण संस्थांकडून माहिती मागवली. संबंधित अभिलेखांनुसार, २८ जून रोजी सायंकाळी ७.४० वाजता जळगाव विमानतळावरून बाळापूर परिसरातून अमरावतीच्या दिशेने प्रशिक्षण विमानाने उड्डाण केले होते.

विमानतळ प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारदाराने दिलेला व्हिडिओ दाखवण्यात आला. अधिकाऱ्यांनी हे दृश्य ड्रोनचे नसून प्रशिक्षण विमानाचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच घटनास्थळाची पाहणी आणि प्लेन फाइंडर ॲपवरील विमान वाहतुकीच्या नोंदींची पडताळणीही करण्यात आली.

उपलब्ध पुरावे, विमानतळ प्रशासनाची माहिती आणि विमान वाहतुकीच्या नोंदींच्या आधारे ड्रोनद्वारे रेकी केल्याचा संशय प्राथमिक चौकशीत पुष्ट झाला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित तक्रारींची उपलब्ध पुरावे आणि वस्तुस्थितीच्या आधारे चौकशी केली जात असल्याचेही पोलीस प्रशासनाने नमूद केले.


Protected Content

Play sound