जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील मेहरून परिसरातील कंजरभाट समाजाच्या स्मशानभूमीच्या विकास, सुशोभीकरण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महापौर दिपमाला काळे यांना निवेदन देण्यात आले. समाजाच्या अत्यंत संवेदनशील आणि पवित्र अशा स्मशानभूमीची दयनीय अवस्था मांडत तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मेहरून परिसरातील मौजे गट क्रमांक ४२४/२ मधील कंजरभाट समाज स्मशानभूमी सध्या अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असून अंत्यसंस्काराच्या वेळी समाजबांधवांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. स्मशानभूमीमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

निवेदनानुसार, पावसाळ्यात चिखलामुळे परिसरात वावर करणे कठीण होते, तर उन्हाळ्यात सावलीचा अभाव जाणवतो. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, वीज उपलब्ध नाही, बसण्यासाठी योग्य व्यवस्था नाही, तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अपुरा असल्याने अंत्यविधीच्या वेळी मोठ्या अडचणी निर्माण होतात. परिसरात नियमित स्वच्छतेचा अभाव असल्यानेही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
विशेष म्हणजे, स्मशानभूमी परिसरात नाला असून त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षण भिंत बांधून वरून स्लॅब टाकण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना विसाव्यासाठी सुनियोजित जागा उभारणे अत्यावश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे स्मशानभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण परिसराला संरक्षण भिंत उभारणे, अस्थी ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारणे, पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल आणि जलव्यवस्था करणे, वीज जोडणी करणे, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता तयार करणे, परिसराची नियमित स्वच्छता व देखभाल करणे आणि नाल्यावर भिंत व स्लॅब बांधकाम करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
या निवेदनावेळी अध्यक्ष योगेश बागडे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, सचिव राहुल नेतलेकर, संजय मोती, खजिनदार वीर दहियेकर, संदीप बागडे, पंकज गागडे, गणेश बागडे, सुमित माछरे, अर्जुन माछरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी महापौर दिपमाला काळे यांनी या मागण्यांची दखल घेत शहर अभियंता योगेश बोरोले यांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती देण्यात आली.



