जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राज्यात उन्हाळ्याचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक शहरांमध्ये तापमानात कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान, उष्णतेच्या लाटेत तीन जणांचा, जळगावमध्ये एक आणि नागपुरात दोघांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पार सतत वाढत असल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घराबाहेर न पडता सावलीचा व थंड पेयाचा आधार घेत आहेत. जळगाव आणि विदर्भाता उन्हाने कहर केला आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिजर्व बँक चौकात एका व्यक्तीचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना कॉटन मार्केट परिसरात घडली आहे.
धक्कादायक म्हणजे, दोन्ही व्यक्तींचे मृतदेह रस्त्यावर मृतावस्थेत सापडले होते. पोलिसांनी त्याचा पंचनामा करून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असता प्राथमिक अहवालात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष पुढे आला. तर, जळगावात आणखी एकाचा उष्माघाताने बळी गेला आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील 48 वर्षीय शेतमजुराचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. उष्णाघाताचा चाळीसगाव तालुक्यात पहिला तर जळगाव जिल्ह्यातील दुसरा बळी गेल्याने जिल्हा हादरला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील सुंदरलाल सुकदेव गढरी हा शेतमजूर बकऱ्या चारण्यासाठी मेहूणबारे परिसरात होता. सकाळी नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी गेला असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आल्याने ते घरी आले. त्यांना डॉक्टरकडे नेले असतानाच त्याचा मृत्यू झाला. खाजगी डॉक्टराने त्यांना तपासले असता उष्माघाताने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले असता अद्याप अहवाल येणे बाकी आहे. मात्र उष्माघातामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याची झाल्याचे मत शेतमजूर सुदरलाल गढरी यांच्या मुलाने व्यक्त केले.
मृत सुंदरलाल गढरी यांची घरची परिस्थिती बेताची व गरीबीची होती. मोलमजुरी करून तसेच बकऱ्या चारून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांना कुठलाही आजार नसतांना बकऱ्या चारण्यासाठी गेले आणि दुपारी अचानक चक्कर आला त्यामुळे ते घरी आले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने मेहूणबारेसह परिसराव एकच शोककळा पसरली आहे.