राज्यातील प्रत्येक व्यक्तीला पाणी पुरवण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न : ना. गुलाबराव पाटील

जळगाव, प्रतिनिधी | ‘पाणी पुरवठा आणि स्वच्छता’ हे राज्य मंत्रीमंडळातील अतिशय महत्वाच्या खात्याची धुरा दोन वर्षे सांभाळण्याचे सौभाग्य मला मिळाले असून या कालावधीत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला पाणी पुरवण्यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न केले असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाला आज दोन वर्षे पूर्ण झालीत. यानिमित्त आपल्या खात्याच्या माध्यमातून दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा प्रस्तुत करतांना त्यांनी महत्वाचे टप्पे विशद केले. ते पुढे म्हणाले की. यासाठी जलजीवन मिशन, स्व. मीनाताई ठाकरे पाणी पुरवठा योजना, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प आणि अटल भूजल योजना आदींसह अन्य योजनांच्या माध्यमातून अविरतपणे कार्य सुरू आहे. कोरोनाच्या आपत्तीच्या कालखंडातही आपण राज्यभरात सुरळीत पाणी पुरवठा करू शकल्याचे तसेच स्वच्छता विभागामार्फत भरीव काम केल्याचे समाधान आपल्याला आहे. याच प्रकारे आगामी काळातही आपण राज्यातील प्रत्येकाला पुरेसे पाणी देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

ना. गुलाबराव पाटील यांनी दि.३० नोव्हेंबर २०१९ रोजी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना ‘पाणी पुरवठा आणि स्वच्छता’ हे अतिशय महत्वाचे दोन खाते मिळाले. आज त्यांच्या मंत्रीपदाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांनी दोन वर्षातील कामाचा आराखडा प्रस्तुत करतांना आगामी पुढील वाटचालीबाबतचे व्हिजन देखील सादर केले.
ते म्हणाले की, “आज राज्यात जलजीवन मिशन, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प आणि अटल भूजल योजना या तीन मुख्य केंद्र पुरस्कृत योजना सुरु आहेत. या तीनही योजनांच्या माध्यमातून राज्यातील पेयजल व्यवस्था व भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सक्षम करण्यासाठी आम्ही भर दिला आहे. या तीनही योजनेच्या अंमलबजावणोमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा मोठा वाटा आहे. किंबहुना राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प व अटल भूजल योजनाकरिता प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा म्हणून भूजल सर्वेक्षण आणि विकास  यंत्रणेच्या माध्यमातून राज्यात १७८ पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळांचे जाळे विस्तारले आहे. याद्वारे शुद्ध जल जनतेस मिळण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत” असे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, “आधीच्या पाणी पुरवठा योजनांमधील सर्व त्रुटी दूर करून केंद्र व राज्य सरकारने जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला घरपोच पाणी देण्याचे नियोजन केले आहे. याच्या अंतर्गत सन २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या आधीच्या योजना या दरडोई ४० लीटर पाण्याच्या निकषावर आखण्यात आल्या होत्या. तर जलजीवन मिशन ही ५५ लीटर दरडोई या निकषावर अंमलात आली आहे. आधी गुरांना लागणार्‍या पाण्याचा यात विचार करण्यात आला नव्हता. तर जल जीवन मिशनमध्ये याचा पूर्णपणे विचार करण्यात आला आहे. आधीची योजना ही पाणी टाकीपर्यंत पोहचवण्यासाठी अंमलात आल्या होत्या. तर जलजीवन मिशन मध्ये प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचे मिशन आखण्यात आले आहे. आधीच्या योजना जलसाठा करणार्‍या टाकीपर्यंत पाणी पोहचवण्यासाठी होत्या. आता जलजीवन मिशनमध्ये प्रत्येक घराला नळजोडणी मिळणार आहे.”

*ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “मी पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्रीपद सांभाळण्याच्या काही दिवसांच्या आधी म्हणजेच १५ ऑगस्टपासून जल जीवन मिशन सुरू करण्यात आले होते. मी कार्यभार घेतला तेव्हा राज्यातील ३४.०२ टक्के म्हणजेच एकूण ४८ लाख ४३ हजार घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहचत होते. मी या खात्याचा कारभार सांभाळल्यानंतर दोन वर्षात राज्यातील अजून ४६ लाख ८५ हजार घरांमध्ये नळाचे पाणी पोहचले आहे. परिणामी आज राज्यातील १ कोटी ४२ लाख ग्रामीण घरांपैकी ९५ लाख ३० हजार घरांमध्ये नळाचे पाणी पोहचले असून राज्यातील तब्बल ६६.४४ टक्के घरातील जनतेला नळाचे पाणी मिळत आहे. उर्वरित घरांमध्ये नळाचे पाणी पुरवण्याचे उद्दीष्टय आम्ही घेतले असून यासाठी आमचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ही योजना अतिशय यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याने केंद्र सरकारने राज्याला यासाठीचा ७ हजार ०६४ कोटी ४१ लक्ष रूपयांचा अतिरिक्त निधी प्रदान केला असून ही आमच्या खात्याच्या कार्यक्षमतेवर उमटवलेली मोहर होय.

दरम्यान, जलजीवन मिशनची पूरक योजना म्हणून राज्यात “स्व. मीनाताई ठाकरे पाणी साठवण योजना” देखील सुरू करण्यात आली आहे. यात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणविणार्‍या दुर्गम भागातील वाडी वस्त्या, पाडे आदींमध्ये ओढा किंवा नदी काठच्या सार्वजनिक विहिरीतून पावसाळ्याच्या दरम्यान वा लगतच्या कालावधीतून पाझरणार्‍या पाण्यातून साठवण टाकी भरली जाईल अशी तजवीज करण्यात आली असून राज्यात ही योजना यशस्वीपणे सुरू आहे.”

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, “माझ्याकडे असणार्‍या खात्यात स्वच्छता विभागाचाही समावेश आहे. कोरोनाच्या आपत्तीमध्ये स्वच्छतेचे महत्व खर्‍या अर्थाने जगाला कळले आहे. या काळात “स्वच्छाग्रहींना” मुदतवाढ देऊन त्यांच्या कार्याला बळकटी देण्याचे काम आमच्या खात्याने केले. याचा कोविडच्या प्रतिकारासाठी मोठ्या प्रमाणात लाभ झाला. तर, राज्यात हगणदारीमुक्तीसह स्वच्छतेच्या विविध कामांना गती प्रदान करण्यात आलेली आहे.”

ना. गुलाबराव पाटील शेवटी बोलतांना म्हणाले की, “दोन वर्षाचा काळ हा अल्प असला आणि यातील जवळपास पावणे दोन वर्षे ही कोरोनाच्या आपत्तीच्या प्रतिकारात गेली असली तरी या विपरीत स्थितीतही राज्याच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याने आपल्या कामाची छाप निश्‍चितपणे उमटवली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे.” राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आगामी काळात देखील याच तडफेने कार्य करत राहू हा संकल्प मी मंत्रीपदाच्या द्वितीय वर्धापनदिनाला घेत असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.

Protected Content