झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भाजपच्या भूलथापांना नाकारले : शिवसेना

uddhavthackeray modi

 

मुंबई (वृत्तसंस्था) लोकांनी ठरवले की ते सत्ता, दबाव व आर्थिक दहशतवादाची पर्वा करीत नाहीत. हवा तो बदल घडवून आणतात. महाराष्ट्रात ते झालेच. झारखंडही बेडरपणे बदलाला सामोरे गेले. भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. आता झारखंडही गमावले आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजपच्या हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा होती, पण झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा व आमिषांना बळी पडण्याचे नाकारले हे सत्य स्वीकारावे लागेल. भाजपच्या झारखंडमधील पराभवानंतर शिवसेनेनं भाजपवर ‘सामना’तून निशाणा साधला आहे.

 

सोमवारी झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. भाजपाने महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमधील सत्ताही गमावली. विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने ४७ जागाजिंकत भाजपचा धुव्वा उडवला. झारखंड विधानसभा निवडणुकीत ६५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपला २५ जागा मिळवता आल्या. २०१४ च्या निवडणुकीत भाजप ३७ जागांवर विजयी मिळाला होता. यावरून शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. भाजपाने आता झारखंडही गमावले. हे असे का? याचा विचार करतील अशी त्यांची मानसिकता नाही. जनतेला गृहीत धरले की, वेगळे काय घडणार!, भाजपची घोडदौड अनेक राज्यांत लंगडी पडली हे चित्र विचार करायला लावणारे आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

 

एक महिन्यापूर्वी हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक झाली. तेथेही काँग्रेसने मुसंडी मारली. भाजपची सत्ता तेथूनही जवळ जवळ गेलीच होती, पण ज्या दुष्यंत सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच दुष्यंत यांचा टेकू घेत, त्यांना उपमुख्यमंत्रीपद देत भाजपने कशीबशी सत्ता राखली. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विराजमान झाले. २०१८ साली भाजप साधारण ७५ टक्के प्रदेशांत सत्ता ठेवून होती. आता घसरगुंडी झाली आहे व जेमतेम ३०-३५ टक्के प्रदेशांत भाजपची सत्ता दिसत आहे.

 

भाजपची घोडदौड अनेक राज्यांत लंगडी पडली हे चित्र विचार करायला लावणारे आहे. २०१८ ला देशातील २२ राज्यांत भाजपची सत्ता होती. ईशान्येकडील राज्यांतही भाजप घुसली. अगदी त्रिपुरा, मिझोरामपर्यंत त्यांचे झेंडे फडकले, पण आज त्रिपुरात निवडणुका घेतल्या तर तेथील जनता भाजपची सत्ता उलथवून लावील अशी स्थिती आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संदर्भात सगळय़ात जास्त त्रिपुरात हिंसाचार झाला व तो रोखण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. हे संपूर्ण देशातच घडताना दिसत आहे.

Protected Content