रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातून भरधाव वेगाने धावलेल्या संशयित कारने गुरुवारी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. या घटनेचा तपास करताना रावेर पोलिसांनी मोठा खुलासा केला असून, दरोडा टाकण्याच्या किंवा लुटमारीच्या तयारीत असलेल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तलवार, लोखंडी टॉमी, स्क्रू ड्रायव्हर, पिंचीस, दोरी, बनावट नोटांचे बंडल आणि कारसह सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी पाल येथून आभोडा मार्गे एक मारुती सुझुकी कार (क्र. एमएच-१९-२४०३) भरधाव वेगाने रावेर शहरातून जात होती. कारचा वेग इतका प्रचंड होता की अनेक नागरिकांचे प्राण थोडक्यात बचावले. ही कार आठवडे बाजार परिसरातील जुन्या नाल्याजवळून महामार्गावर जाण्याच्या प्रयत्नात असताना चिखलात अडकली. त्यामुळे संशयितांचा पुढील डाव फसला आणि परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत कारमधील संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींची नावे निखिल प्रवीण पाटील (वय २०), अल्ताफ जलाल शेख (वय २६, दोघे रा. घोडबंदर, जि. ठाणे) आणि मेहेरबान जहागीर तडवी (रा. पाल) अशी निष्पन्न झाली. या प्रकरणात काही अन्य साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपींच्या कारची झडती घेतली असता त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरली जाऊ शकणारी तलवार, लोखंडी टॉमी, स्क्रू ड्रायव्हर, पिंचीस, सुती दोरी तसेच लहान मुलांच्या खेळासाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट नोटांचे बंडल आढळून आले. याशिवाय सुमारे तीन लाख रुपये किमतीची कारही जप्त करण्यात आली. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपींच्या हालचाली आणि त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही ही श्रीकांत धिवरे पोलिस अधिक्षक जळगांव, संदीप गावीत अपर पो. अधिक्षक जळगांव परीमंडळ, तसेच अनिल बडगुजर पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशन चे पो.नि.संदीप पाटील, पो.उप.निरीक्षक मनोज महाजन, पो.उप.निरीक्षक तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ समाधान ठाकुर, इश्वर चव्हाण, सुनिल वंजारी, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, संतोष हदा यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास हा पो.उप.निरीक्षक तुषार पाटील हे करीत आहेत.



