Home प्रशासन भुसावळमध्ये GNRF च्या वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ 

भुसावळमध्ये GNRF च्या वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ 

0
12

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बदलते हवामान, वाढते तापमान आणि पर्यावरणीय असमतोलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी दावत-ए-इस्लामी इंडिया यांच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज वेल्फेअर फाउंडेशन) तर्फे भुसावळ येथे वृक्षारोपण मोहिमेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमातून अधिकाधिक वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.

दावत-ए-इस्लामी इंडिया यांच्या वतीने दरवर्षी १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत देशभर विशेष वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत GNRF च्या स्वयंसेवकांनी आतापर्यंत देशभरात लाखो वृक्षांची लागवड केली असून पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्य सुरू ठेवले आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरातील उस्मानिया मशिदीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांना वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व पटवून देत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान दावत-ए-इस्लामी इंडिया, जळगाव जिल्हाध्यक्ष झुबैर अत्तारी यांनी GNRF च्या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, यंदाच्या मोहिमेत प्रत्येक जिल्ह्यात किमान १,२०० वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांना स्वच्छ, हिरवेगार व निरोगी वातावरण मिळावे यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

वृक्षारोपणाबरोबरच झाडांचे संगोपन, नियमित पाणी देणे आणि त्यांचे संरक्षण करणे हीदेखील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. पर्यावरण संवर्धनासाठी शासनासह सामाजिक संस्थांनी राबविलेल्या अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक जनजागृती होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोएब अत्तारी, साबीर इकबाल, जहांगीर शेख, अब्दुल सईद, मतीन इंजिनिअर, फरीद शेख, युसुफ खान, जोएब शेख, आबिद मदनी, हाजी तनवीर, साबीर मेंबर, खालिद अत्तारी, हाफिज कासिम तसेच GNRF चे जिल्हाध्यक्ष रफीक रोशन यांनी विशेष परिश्रम घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


Protected Content

Play sound