Home Cities यावल FMGE परीक्षेत यावलच्या डॉ. विवेक धनके यांचे घवघवीत यश 

FMGE परीक्षेत यावलच्या डॉ. विवेक धनके यांचे घवघवीत यश 

0
9

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मुंजलवाडी येथील सुपुत्र तथा माजी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांचे चिरंजीव डॉ. विवेक विश्वनाथ धनके यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) आयोजित फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) जून २०२६ परीक्षेत १५१ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत यश मिळवून त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर यावल तालुका आणि मुंजलवाडी गावाचेही नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) तर्फे नुकताच FMGE जून सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेला देशभरातून ३७ हजार ४४८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ हजार १४८ विद्यार्थी अनुपस्थित राहिले, तर केवळ ४ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. तब्बल ३१ हजार ६४५ विद्यार्थी अपयशी ठरल्याने परीक्षेचा निकाल अवघ्या १२.३८ टक्के इतका लागला. अशा अत्यंत कमी निकालाच्या पार्श्वभूमीवर डॉ. विवेक धनके यांनी १५१ गुणांसह यश मिळविल्याने त्यांच्या गुणवत्तेची आणि मेहनतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

आज घोषित झालेल्या निकालानंतर डॉ. विवेक धनके यांनी FMGE ही अनिवार्य परीक्षा उत्तीर्ण करत भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता प्राप्त केली आहे. त्यामुळे ते अधिकृतपणे एमबीबीएस डॉक्टर म्हणून वैद्यकीय सेवा देण्यास पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे परीक्षा केंद्र योगायोगाने कोल्हापूर येथे होते. त्यांच्या या यशामुळे मुंजलवाडी गावात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. गावकऱ्यांच्या मते, डॉ. विवेक धनके यांचे यश हे त्यांच्या कठोर परिश्रम, सातत्य, जिद्द आणि चिकाटीचे फलित आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली ही परीक्षा उत्तीर्ण करणे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. अशा परिस्थितीत त्यांनी मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

FMGE म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन ही परदेशातून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य स्क्रीनिंग परीक्षा आहे. रशिया, चीन, युक्रेन, नेपाळ, फिलिपाइन्ससह विविध देशांतून वैद्यकीय पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या परीक्षेत यश मिळाल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्यांना स्टेट मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करून अधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करता येतो. यंदाच्या निकालाने परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा, परीक्षेची वाढती कठीणता आणि भारतात डॉक्टर म्हणून मान्यता मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना करावा लागणारा संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. लाखो रुपये खर्च करून आणि अनेक वर्षे परदेशात शिक्षण घेतल्यानंतरही FMGE ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांसाठी ती मोठी कसोटी मानली जाते.


Protected Content

Play sound