प्रवाश्याला धमकी देवून लुटणाऱ्या रिक्षाचालकासह तिघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । रिक्षातून जात असलेल्या एका प्रवाश्याला रिक्षा चालकासह तीन साथीदारांनी मिळून जीवे मारण्याची धमकी देवून लुटले. ही घटना आज मंगळवारी दुपारी १ वाजता नेरी नाका स्मशानभूमीजवळ घडली. दरम्यान, घटना घडल्याच्या सहा तासातच दोन संशयितांना पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.

 मोहसीन खान नूर खान (२७) व शाहरूख शेख रफिक शेख (१९) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सविस्तर माहिती अशी की, अब्दूल कलीम अब्दूल गफूर (५९) हे जामनेर येथे पत्नी व मुलांसह वास्तव्यास आहेत.  आज मंगळवारी ८ जून रोजी दुपारी ते घरगुती साहित्य खरेदीसाठी जामनेर येथून जळगाव येथे बसने आले. दुपारी १ वाजता अजिंठा चौफुली येथे उभे ते रिक्षाची प्रतीक्षा करीत होते. त्यावेळी एका चालकाने कुठे जाणार असे विचारले, तेव्हा त्यांनी चित्रा चौक जायचे असल्याचे सांगितले व नंतर रिक्षात बसले. आधीच रिक्षामध्ये तीन प्रवासी व्यक्ती बसलेली होती. व्यवस्थित बसता येत नाही म्हणून एका प्रवाशाने नेरीनाका स्मशानभूमीजवळ रिक्षा थांबविली. नंतर त्याने अब्दूल कलीम यांना धक्काबुक्की करित रिक्षाच्या खाली उतरविले.

अब्दूल कलीम अब्दूल गफूर यांना रिक्षातून उतरविल्यानंतर चालकासह रिक्षातील तिघांनी त्यांच्या खिशातील पंचवीस हजार रूपयांनी रोकड बळजबरीने काढून घेतली. नंतर कुणाला सांगितले तर मारून टाकू अशी धमकी देवून त्यांना रिक्षाच्या बाजूला लोटून दिले. रिक्षा चालकासह त्याच्या तिघा साथीदारांनी तेथून पोबारा केला.  त्यानुसार चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी लागलीच तपासाला सुरूवात केली. मोहसीन खान नूर खान व शाहरूख शेख रफिक शेख या दोघांचा लुट प्रकरणात सहभाग असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, सचिन पाटील, साईनाथ मुंडे यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोघांना गेंदालाल मिल भागातून अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर दोघांना गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यात रिक्षा चालक अशरफ पिंजारी व हर्षद मुलताणी यांचा समावेश असल्याचे समोर आले.

 

Protected Content