दोघं गुलाबरावांच्या वाटेत काटेरी आव्हानं !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे गुलाबराव पाटील व राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर हे दोन्ही एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. परंतु या दोघं गुलाबरावांच्या वाटेत स्वकीयकच काटे ठरण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे हे दोघं आपल्या सोबतच्या लोकांची नाराजी कशी दूर करतात? यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे. दोघं गुलाबरावांकडे प्रामाणिक कार्यकर्त्यांप्रमाणे डबल ढोलकी कार्यकर्त्यांचा देखील मोठा भरणा आहे. अशा डबल ढोलकीवाले कार्यकर्त्यांमूळेच दोघं गुलाबरावांनी प्रत्येकी एकेकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. एकंदरीत दोघं गुलाबरावांच्या वाटेत काटेरी आव्हानं आहेत. दोघांकडून कसा मार्ग काढला जातो यावरच त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

निवडणूक आली की गल्ली बोळात शिरून अगदी छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये जाऊन आपला पक्ष आणि नेत्याकरिता मत मागणारा हा कार्यकर्ता असतो. निवडून आलेले नेत्याने पाच वर्ष नीट लक्ष दिले नाहीत म्हणून नागरिक जेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांना खडे बोल ऐकवतात, तेंव्हा प्रामाणिक कार्यकर्ता तोंडाला फेस येईपर्यंत नागरिकांची समजूत काढत असतो. परंतु काही कार्यकर्ते म्हणजे “चाय से ज्यादा किटली गरम” सारखे असतात. त्यांना राजकारणातला क म्हणता ढ कळत नाही. पण वागणे असे असते की,पुढचा आमदार,खासदार हेच ठरवणार किंवा निवडून आणणार असतात. तर काही कार्यकर्ते सर्व काही चुकीचं होतेय, हे कळत आणि दिसत असून सुद्धा नेत्यांना त्यांची चूक दाखविण्याची हिम्मत करत नाही. मुळात आपली नाराजी बोलून न दाखवता नेत्यांकडून अधिकच्या चुका होऊन,अडचणी वाढल्यावर त्यांची जेव्हा गरज भासते तेव्हा, अशा कार्यकर्त्यांना आनंदच होत असतो. जळगाव ग्रामीण मतदार संघात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. आपापल्या नेत्याच्या सोबत फिरायचे परंतु समोरच्या गुलाबरावाची खाजगीत तारीफ करायची. किंबहुना आपल्या गुलाबरावकडून कशा चुका होतील,याचीच वाट बघायची आणि चूक झाली की, आपले महत्व वाढवून घ्यायचे. त्यामुळे आजच्या घडीला दोघं गुलाबरावांकडून कोणत्या चुका होत आहेत आणि त्यांना निवडणुकीला सामोरे जातांना कोणत्या-कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागणार आहे, हेच नेमके या वार्तापत्रातून आपल्या लक्षात येणार आहे.

 

गुलाबराव पाटीलांना द्यावा लागेल सोशल इंजिनिअरीग भर 

सर्वप्रथम विद्यमान आमदार तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अडचणी आणि जमेच्या बाजूंचा विचार केला तर सध्या सत्तेत असल्यामुळे ‘अँटी इन्कम्बन्सी’ फटका गुलाबभाऊंना बसू शकतो. मिळालेल्या मंत्रीपदाचा आपल्या मतदार संघासाठी पाहिजे तसा त्यांना उपयोग करून घेता आला नाहीय,हे सत्य देखील ते नाकारू शकत नाही. अर्थात पालकमंत्रीपद देखील त्यांना दुसऱ्याच जिल्ह्याचे मिळाले,हे त्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. मंत्रिपद असल्यामुळे कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यात गुलाबभाऊंनी पुरेपूर प्रयत्न केलाय. परंतु अनेक ठिकाणी नाराजी देखील आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी आपल्या मुलाला उमेदवारी म्हणून रमेश पाटील सारखा खंदा समर्थक राष्ट्रवादीत गेला. अर्थात यामुळे प्रताप पाटील यांना विजय मिळविताना भले मोठे कष्ट घ्यावे लागले असे देखील नाही. त्याच पद्धतीने ऐनवेळी उमेदवारी बदलल्यामुळे झालेल्या घोळातून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला साळवा-नांदेडचा जि.प गट भाजपच्या ताब्यात गेला. त्यामुळे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील हे देखील दुखावले गेले आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांचे समर्थक अद्यापही कमालीचे नाराज आहेत. याच पद्धतीने शिरसोली परिसरातील रावसाहेब पाटील हे देखील २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून नाराज आहेत. किंबहुना रावसाहेब पाटील यांच्या नाराजीमुळेच शिरसोली-चिंचोली गटातून गुलाबराव देवकर यांचे बंधू नाना देवकर हे निवडून आल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. एकंदरीत मराठा समाजातील काही महत्वपूर्ण मंडळी गुलाबभाऊंपासून दुरावले गेल्याचे चित्र निर्माण झाले होते.

गुलाबराव पाटील हे सोशल इंजिनिअरीगचे मास्टर मानले जातात. गुलाबभाऊंकडे आजच्या घडीला मोठा समुदायासह अत्यल्प घटकातील देखील निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज आहे. खरं म्हणजे ही फौज आणि सोशल इंजिनिअरीगच्या जोरावरच गुलाबभाऊं स्वतः अल्प समुदायाचे प्रतिनिधी असतांना देखील त्यांनी तीन वेळेस विजय मिळविलेला आहे. त्यामुळे मतदार संघातील सोशल इंजिनिअरीगमध्ये मात खातील ते गुलाबभाऊं कसले. धरणगावचे माजी नगराध्यक्ष तथा मूळ राष्ट्रावादीचे असलेले पी.एम.पाटील व चांदसरच्या मंजुषा पवार यांना पंचायत समिती सभापती पद देऊन गुलाबभाऊंनी समतोल साधून घेतलाय. एवढेच नव्हे तर,सलीम पटेल यांना लोकनियुक्त नगरध्यक्षच्या निवडणुकीत विजयी करत मतदार संघातील सोशल इंजिनिअरीगवरिल आपली पकड सिद्ध करून दाखविली आहे. गुलाबभाऊंनी शिवसेनेचे संघटन प्रचंड मजबूत केलेले आहे. अगदी प्रत्येक बूथवर त्यांच्याकडे ढीगभर इमानदार कार्यकर्ते आहेत. मुळात हीच गोष्ट गुलाबभाऊंसाठी कायमच जमेची बाजू राहत आली आहे. दुसरीकडे इतर पक्षाच्या उमेदवारांना मात्र, बूथ निहाय रोजंदारीने कार्यकर्ते लावावे लागतात. जळगाव मतदार संघातील सर्वात जास्त मतदान असलेल्या धरणगाव शहरातील सलीम पटेल, विनय भावे,वासू चौधरी,राजू महाजन तसेच उद्योजक सुरेश चौधरी आणि जीवनसिंग बयस हे गुलाबभाऊंचे खंदे समर्थक आहेत. निवडणुकीच्या काळात मोठा आर्थिक भार ही मंडळी आपल्या खांद्यावर घेत असल्यामुळे गुलाबभाऊंना धरणगाव तालुक्याकडे फार लक्ष देण्याची गरज पडत नाही. सलीम पटेल हे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष तसेच पडद्याआडून अनेक राजकीय खेळी खेळून गुलाबभाऊंना मोठी मदत करत असतात. अगदी पक्षांतर्गत विरोधकांना शांत करण्यापासून तर विरोधी पक्षातील नेत्यांशी जुळवून घेण्यात सलीम पटेल यांचा हातखंडा आहे. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे या निवडणुकीत सलीम पटेल रिंगणाबाहेरून सूत्र सांभाळतील. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीची जबाबदारी आता,विनय उर्फ पप्पू भावे यांना पार पाडावी लागणार आहे.

 

देवकरांना पुन्हा उजळावी लागेल बहुजन प्रतिमा 

जळगाव ग्रामीणमधून भविष्यात निवडणूक लढविणारे माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या बाबतीत विचार केला तर,आजच्या घडीला त्यांच्या समोर अडचणींचा भला मोठा डोंगर आहे. परंतु शांत आणि प्रेमळ स्वभाव ही देवकारांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. देवकरांचा हाच स्वभाव त्यांना विजयाचा समीप नेऊन पोहचवू शकतो. गत विधानसभा निवडणुकीच्या काळात घरकुल घोटाळाप्रकरणी देवकर हे तुरुंगात होते. त्यामुळे त्यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनी मतदार संघाची धुरा सांभाळली होती. अर्थात विद्यमान आमदार असल्यामुळे देवकर यांना देखील ‘अँटी इन्कम्बन्सी’ आणि लहान बंधू नाना देवकर यांच्या फटकळ स्वभावाचा फटका बसला होता. अर्थात मागील पाच वर्षात पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आपल्या मंत्रीपदाच्या काळात देवकर यांनी चुकीच्या कार्यकर्त्यांना आर्थिक सक्षम केले. अर्थात याचा फटका त्यांनाच बसला. कारण असे डबल ढोलकी कार्यकर्ते ऐन निवडणुकीच्या काळात देवकरांना सोडून गुलाबराव पाटील यांच्याकडे गेलेत. नुसते सोबत गेले नाही तर जगजाहीररित्या निवडणुकीला आर्थिक मदत देखील केली. वास्तविक बघता त्या काळात देवकरांकडे अनेक नगरसेवक तथा जि.प,पं.स सदस्य होते. परंतु कुणाचीही आर्थिक कुवत भली नव्हती. त्यामुळे देवकरांना घरातूनच सर्व खर्च भागवावा लागला होता. किंबहुना या निवडणुकीत तर गतवेळेपेक्षा अधिक वाईट परिस्थिती आहे. कारण देवकर यांच्याकडे आज एकही नगरसेवक नाही. जि.प,पं.स सदस्य हे बोटावर मोजण्या इतकेच ते देखील जळगाव तालुक्यातच आहेत. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील पंकज महाजन व असोदा येथील रवी देशमुख हे देवकर यांच्या सोबत आहेत. परंतु यातील देशमुख तसेच आव्हानीचे रमेश पाटील यांची महत्त्वकांक्षा देखील जगजाहीर आहे.

धरणगाव पालिकेच्या वादातून ज्या ज्ञानेश्वर महाजन यांच्याशी देवकर यांचा उघड पंगा झाला,त्याच ज्ञानेश्वर महाजन यांच्याशी जुळवून घेतल्यामुळे देवकारांबाबत धरणगावात चुकीचा संदेश गेलाय. या निमित्ताने पक्षातील वजन तथा धूर्त राजकीय खेळी करण्यात ज्ञानेश्वर महाजन हे देवकरांच्या तुलनेत मजबूत असल्याच्या चर्चा करण्यास वाव निर्माण झालाय. दुसरीकडे देवकर मतदार संघात फिरत असतांना त्यांच्यासोबत विशिष्ट चेहरेच दिसतात. त्यामुळे न कळत देवकरांवर मराठा नेत्याचा शिक्का बसत आहे. मुळात ज्यावेळी पहिल्यांदा देवकर हे जळगाव ग्रामीण मतदार संघात आले,त्यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या सोशल इंजिनिअरीगला बहुजन नेतृत्वाच्या नावाखाली जबरदस्त मात दिली होती. परंतु मागील काही दिवसापासून देवकर यांची बहुजन नेत्याची प्रतिमा खुद्द देवकरांच्या काही कार्यकर्त्यांमुळे आणि विरोधकांमुळे धूसर होतेय. मतदार संघात राष्ट्रवादीचे पक्ष संघटन देखील कमालीचे कमकूवत आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी देवकर यांना विशेष मेहनत घ्यावी लागेल. गत विधानसभेच्या वेळी धरणगावचे सूत्र तत्कालीन पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते दीपक वाघमारे यांनी सांभाळले होते. वाघमारे यांनी रचलेल्या व्यव्हरचनेमुळेच कोणत्याही बड्या नेत्याशिवाय देवकर यांना धरणगाव शहरातून थोड्या प्रमाणात का असेना मताधिक्य मिळाले होते. परंतु याच गोष्टीचा फटका वाघमारे यांना नगरपालिकेत बसला. तेव्हापासून वाघमारे राजकारणात फार सक्रीय दिसत नाहीय. दुसरीकडे गुलाबराव पाटील यांच्या प्रमाणे निवडणुकीच्या काळात आर्थिक बाजू सांभाळतील असे कार्यकर्ते देवकर यांच्याकडे तूर्त तरी नाहीय. त्यामुळे संघटन आणि आर्थिक अशा दोन्ही पटलावर सर्व सूत्र एकट्या देवकर यांनाच सांभाळायची आहेत.

Add Comment

Protected Content