संतोष बिडवईंकडे जिल्हा बँक निवडणुकीचा कार्यभार नको : अत्तरदेंचे आयुक्तांना पत्र

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडून याचा कार्यभार काढण्यात यावा अशी मागणी भाजपचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी राज्य सहकारी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून यात अर्ज बाद करण्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेचा गैरवापर करत भाजप आणि अन्य काही अपक्षांचे अर्ज बाद केल्याचे आरोप केले आहेत. तर महाविकास आघाडीने याचा इन्कार केला आहे. अर्ज छाननीच्या दिवशी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांनी आपले पती चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह जिल्हा बँकेतच ठिय्या आंदोलन केल्याचे खळबळ उडाली होती.

आता याच प्रकरणी चंद्रशेखर अत्तरदे यांनी पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्याबाबत तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, श्री. बिडवई यांच्या विरोधात ठाणे येथील न्यायालयात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम-१९८८ च्या अंतर्गत स्पेशल केस क्रमांक २०/२०१६ प्रलंबीत आहे. अशा प्रकारची चौकशी सुरू असतांना शासन निर्णयानुसार त्यांना अकार्यकारी या पदावर नियुक्ती मिळावी असे अपेक्षित असतांना त्यांची जळगाव जिल्हा उपनिबंधकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या संदर्भात आपण २८ सप्टेंबर २०२१ रोजी सहकार खात्यातर्फे अर्ज केला असून यावर कार्यवाही सुरू केली आहे.

या अनुषंगाने संतोष बिडवई यांच्याकडे जिल्हा बँक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असलेला कार्यभार काढून टाकावा अशी मागणी या निवेदनात चंद्रशेखर अत्तरदे यांनी केली आहे.

Protected Content