ही निवडणूक माझी शेवटची : मंत्री दीपक केसरकर

सिंधुदूर्ग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हणत राजकारणातून संन्यास घेणार असल्याची महत्वाची घोषणा केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि सावंतवाडी विधानसभेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपली मुलगी सोनाली केसरकर आणि सुरज केसरकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगत राजकीय निवृत्तीची घोषणा केली.

‘माझी सोनाली माझी राजकीय वारसदार नाही. मला कोणताही राजकीय वारसा नाही. माझी मुलगी गोर गरिबांच्या हितासाठी काम करत राहावे असे मला वाटते. मुलगा सुरजही तसाच आहे. राजकारणात आमदारकी हे एकच पद नसते. विधानपरिषद, जिल्हा परिषद असते. राजकीय वारसा घोषित करायला मला परंपरागत राजकारणात संधी मिळाली नाही. ही खरोखर माझी शेवटची निवडणूक आहे. पुढच्या काळात माझा राजकीय वारसदार तयार व्हायलाच लागेल. पण तो माझा नाही पक्षाचा वारसदार असेल. ऐन विधानसभेचा प्रचार संपत आला असतानाच दीपक केसरकर यांनी ही मोठी घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Protected Content