‘चौकीदार चोर है’ बद्दल राहुल गांधी म्हणतात ‘गैरअर्थ काढला’

Rahul Gandhi

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुप्रीम कोर्टाचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केलेल्या ‘चौकीदार चोर है’ या टीकात्मक वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारात येणाऱ्या विषयांवर ओघात आपण ‘चौकीदार चोर है’ असे सुप्रीम कोर्टाशी संबंध जोडत शब्द प्रयोग केले, मात्र ते चुकीच्या अर्थाने घेतले गेले, असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाला दिले आहे.

 

‘चौकीदार चोर है’ हे वक्तव्य मी राजकीय प्रचाराच्या ओघात केले आहे. मात्र माझ्या राजकीय विरोधकांनी त्या वक्तव्याचा गैरअर्थ काढलेला आहे. मी हे वक्तव्य जाणूनबुजून, हेतुपुरस्सर केले असल्याची तक्रार त्यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. मात्र तशा प्रकारचे काहिही माझ्या मनात नाही, असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी कोर्टाला दिले.

‘चौकीदार चोर है’ या राहुल गांधी याच्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि नवी दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता. राहुल यांचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित असल्याचे लेखी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते.
राफेल कराराप्रकणी सुप्रीम कोर्टाने नव्या दस्तावेजांच्या आधारे पुनर्विचार याचिका स्वीकार केल्यानंतर राहुल गांधी यांनी हे प्रकरण ‘चौकीदार चोर है’ असा शब्दप्रयोग करत लोकांसमोर मांडले होते. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस जारी करत २२ एप्रिलपर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते. कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात कोणतेही वक्तव्य केलेले नसल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील पीठाने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचे म्हणणे चुकीच्या पद्धतीने लोकांपुढे सादर केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. आता या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

Add Comment

Protected Content