नीरव मोदीला कोणत्या तुरुंगात ठेवणार? लंडनच्या न्यायालयाचा सवाल

nirav modi 1

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाब नॅशनल बँकेचा १३७०० कोटी रुपयांचा घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी नीरव मोदीच्या कोठडीत २७ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठीची सुनावणी लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात काल पार पडली. त्यावेळी कोर्टाने भारत सरकारला नीरव मोदीला कोणत्या तुरुंगात ठेवणार? असा सवाल करत १४ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नीरव मोदीला वेस्टमिन्स्टर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश एम्मा अर्बुथनॉट यांच्यापुढे नीरव मोदीची सुनावणी झाली. नीरव मोदीला ३० मे रोजी चौथ्यांदा ब्रिटनच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी पुन्हा एकदा त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. तसेच त्याच्या न्यायालयीन कोठडी २७ जूनपर्यंत वाढ करण्यात आली होती. नीरव मोदी याच्यापूर्वी विजय माल्याच्या प्रकरणातही न्यायाधीश एम्मा अर्बुथनॉट यांनीच त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांनी माल्याच्या प्रत्यार्पणाचा निर्णय सुनावला होता. तेव्हा भारतीय यंत्रणेने आर्थर रोडच्या तुरुंगाचा व्हिडिओ दाखवत इथे माल्याला ठेवण्यात येईल, असे सांगितले होते. दरम्यान, १९ मार्च रोजी नीरवला सेंट्रल लंडनच्या मेट्रो बँक शाखेतून अटक करण्यात आली. तेथे नीरव मोदी बँक खाते उघडण्यास गेला होता. त्याने आपल्याला जामीन मिळावा आणि आपले प्रत्यार्पण रोखावे यासाठी तेथील कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र, याआधी त्याच्या दोन याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्याने वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला होता.

Add Comment

Protected Content