डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांचे आंदोलन (व्हीडीओ)

dr.payal tadavi

 

जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या डॉ.पायल तडवी आत्मह्त्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि यातील गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी जळगावमधील विविध संघटनांनी एकत्र येत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.

 

मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. डॉ. पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीला तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून नायर रुग्णालयातील महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ पायल तडवी या मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी होत्या.

 

यावेळी आंदोलकांनी विविध घोषणा दिलाय. एवढेच नव्हे, आरोपींना कडक शिक्षा व्हावी म्हणून,खटला जलद न्यायालयात चालवावा. डॉं.पायलच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या विभाग प्रमुख व महाविद्यालायचे डीन यांच्याविरुद्ध कारवाई करावी. डॉं. पायलच्या आई-वडिलांना तात्काळ शासकीय मदत मिळावी. तसेच खटला चालविण्यासाठी डॉ.पायलच्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार तज्ञ वकील नेमावा, अशा विविध मागण्या देखील आंदोलकांनी यावेळी केल्या. या आंदोलनात विद्रोही सांस्कृतिक चळवळचे सतिष सूर्वे, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे विकास मोरे, महिला महिला असोसिएशनच्या वासंती दिघे, मन्यार बिरादरीचे फारुक शेख, वैशाली पाटील, वैशाली झाल्टे, फिरोझ पिंजारी, प्रतिभा शिरसाठ, अश्फाक पिंजारी, नीला चौधरी, गायत्री सोनवणे, अनिस पांडे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष राजू मोरे आदींनी सहभाग नोंदविला.

 

Add Comment

Protected Content