संसदमध्ये प्रथमच राहूल गांधीच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यत्यय आणला

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदीय अधिवेशनादरम्यान केलेल्या अभिभाषणावर लोकसभेत आज (१ जुलै) चर्चा चालू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यानिमित्ताने आज पहिल्यांदाच भाषण केलं. राहुल गांधी भाषण करण्यास उभे राहिल्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या खासदारांनी त्यांच्या भाषणात अनेकदा व्यत्यय आणण्याचा, त्यांचं भाषण रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल गांधी यांनी त्यांचं घणाघाती भाषण चालू ठेवलं. सरकार संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. तसेच लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपासह एनडीएला आरसा दाखवण्याचे काम केलं. राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मोदी अयोध्येतून निवडणूक लढवण्याचा विचार करत होते. त्यांनी दोन वेळा सर्वेक्षणही केलं. मात्र मोदी अयोध्येतून निवडणुकीला उभे राहिले असते तर ते तिथून पराभूत झाले असते. भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणातही तेच म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी यावेळी भाजपाच्या हिंदुत्वावरही टीका केली. भाजपाने हिंदुत्त्वाच्या नावावर देशात भीतीचं वातावरण पसरवले आहे, असा आरोप राहुल यांनी केला. ते म्हणाले, “या सगळ्याची सुरुवात अयोध्यापासून झाली.” त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या शेजारी बसलेले फैजाबादचे (अयोध्या) खासदार अवधेश प्रसाद यांच्याशी हात मिळविला. अवधेश प्रसाद यांनीही उभे राहून सभागृहाला हात जोडून नमस्कार केला. राहुल गांधी अवधेश प्रसाद यांच्याकडे बोट करून म्हणाले, “अयोध्येने भाजपाला संदेश दिला आहे. रामभक्तांनी भाजपाला संदेश दिला आहे.” नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील जनतेने भाजपाला नाकारल्याचा पुरावा राहुल यांनी संसदेत उभा केला. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप घेतला. तसेच ते म्हणाले, “सभागृहात भाषणादरम्यान हस्तांदोलन करणं योग्य नाही.”

दरम्यान, राहुल गांधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्येच उभे राहिले आणि राहुल गांधींचं भाषण मध्येच थांबवत म्हणाले, “हा विषय खूप गंभीर आहे. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं चुकीच आहे, हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा”. त्यावर राहुल गांधी म्हणाले, “मोदी म्हणजे हिंदू समाज नाही, भाजपा म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही, आरएसएस म्हणजे हिंदू समाज नाही. मी मोदी, भाजपा आणि आरएसएसबाबत बोलतोय.”

राहुल गांधी म्हणाले, भाजपानं राम मंदिराचं उद्घाटन केले. मी तिथले स्थानिक खासदार अवधेश प्रसाद यांना विचारले की तुम्हाला कधी जाणवलं की तुम्ही अयोध्येतून लोकसभा निवडणूक जिंकू शकता? त्यावर ते म्हणाले, मला पहिल्या दिवसापासून माहीत होतं की मीच जिंकणार आहे. कारण या लोकांनी (भाजपा) अयोध्येत विमानतळ उभारण्यासाठी तिथल्या रहिवाशांच्या जमिनी बळकावल्या, आजतागायत त्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. अयोध्येतील छोटी दुकानं पाडली, छोट्या इमारती पाडल्या, ते लोक रस्त्यावर आले आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनाला उद्योगपती अदाणी, अंबानींना बोलावलं होतं, मात्र तिथे अयोध्येतील कोणीही नव्हते. त्यानंतर मोदी यांनी पुन्हा एकदा राहुल यांच्या भाषणात व्यत्यय आणला. ते मध्येच उठून उभे राहिले आणि म्हणाले, “अध्यक्ष जी, लोकशाहीने आणि संविधानाने मला शिकवलं आहे…” यावर विरोधक वाह-वाह म्हणून चिमटे काढू लागले. तसेच जय संविधान अशी घोषणाबाजी करू लागले. त्यानंतर मोदी म्हणाले, “मला संविधानाने शिकवलंय की मी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे गांभीर्याने पाहायला हवं.”

Protected Content