मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली असून या योनजेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केल जाणार आहे. या योजनेच्या तिस-या हप्त्याचे वितरण येत्या २९ सप्टेंबर रोजी केले जाणार आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
म्हणजेच येत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या (अर्जदार) खात्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा होतील. दरम्यान, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही, त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार १५ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांमधील घोळामुळे ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली. परंतु, ३१ ऑगस्टपर्यंत देखील अनेक महिलांनी अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे ही मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर अजूनही अर्ज करू शकता.