बनावट चावीच्या मदतीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील चैतन्य नगरातील चित्रप्रभा अपार्टमेंटमधील बंद घरातून बनावट चावीच्या मदतीने सोन्याचे दागिने आणि एटीएममधून रोकड काढून १ लाख ५२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  कल्पना अनिल कुळकर्णी (वय-५४) रा. चित्रप्रभा अपार्टमेंट, चैतन्य नगर, जळगाव या एकट्या राहतात. त्यांची मुलगी भावना पाठक आणि जावई  विजय पाठक हे गणेश कॉलनीत राहतात. कल्पना कुळकर्णी ह्या २९ मे ते ६ जून दरम्यान त्यांचा मुलीचा मुलगा नातू यांच्यासोबत औरंगाबाद येथील बहिणीच्या मुलीच्या घरी गेले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने घरात बनावट चावीच्या मदतीने घरात प्रवेश करून कपाटातील  १ लाख ५० हजार रूपये किंमतीचा सोन्याचा हार आणि त्यांच्या एटीएम कार्डमधून २ हजार रूपयांची रोकड असा एकुण १ लाख ५२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, ६ जून रोजी सकाळी कल्पना कुळकर्णी ह्या घरी आल्या. दरम्यान सोमवार २० जून रोजी दुपारी १२ वाजता घरात साफसाफाई करत असतांना कपाटच्या आतील लॉकर वगैरे चेक केले असता त्यांना त्यांचा ३ तोळ्याचा सोन्याचा राणी हार आढळून आला नाही.

याबाबत मुलगी आणि जावई यांना देखील विचारपुस केली असता त्यांना देखील याची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. याबाबत कल्पना कुळकर्णी यांनी सोमवारी २० जून रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहे.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!