दुचाकीला लावलेल्या पिशवीतून ४० हजार रूपयांच्या रोकडची चोरी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील बेलदार कॉम्प्लेक्स येथील माऊल मेन्स पार्लर समोर दुचाकीला लावलेल्या पिशवीतून ४० हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरूवारी ३० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन रामलाल पाटील वय ३३ रा. भवरखेडा ता.धरणगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून तो आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवारी ३० जानेवरी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सचिन पाटील हा धरणगाव शहरातील बेलदार कॉम्प्लेक्स येथील माऊल मेन्स पार्लर दुकानात आलेला होता. त्यावेळी त्याने त्याची दुचाकी दुकानाच्या समोर लावलेली होती. दुचाकीच्या हॅडलला लावलेल्या पिशवीत ठेवलेले ४० हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना उघडकीला आल्यानंतर सचिन पाटील याने पैशांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीम सैय्यद हे करीत आहे.

Protected Content