रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील भोकर नदीतून रात्रीच्या वेळी अवैधपणे सर्रासपणे खरवा आणि गौणखनिजाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. याबाबत स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांनी तहसीलदार बंडू कापसे यांच्याकडे बेकायदेशीर कारवाईकडे त्वरित लक्ष वेधून कडक पाऊल उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

रावेर परिसराला लागून असलेल्या भोकर नदीत विशेषतः शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी रात्री जेसीबी, ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मदतीने खरवा व गौणखनिजाची वाहतूक केली जात असल्याचे पाहण्यात आले आहे. या वाहतुकीमुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून, पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, या बेकायदेशीर उत्खनानामुळे महसूल विभागाचे मोठे नुकसान होत आहे.
स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांचा आरोप आहे की, महसूल विभागातील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रशासनाने या बाबतीत त्वरित पावले उचलून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार बंडू कापसे यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी या बाबतीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा करून या बेकायदेशीर वाहतुकीविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.