वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान हरिपुरा राऊंड पथक वड्री धरण परिसरात नियमित गस्त घालत होते. यावेळी परिसरात बेवारस अवस्थेत सागवानाचे कटसाईज चौपट आढळून आले. संबंधित लाकूड जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या सागवानाचे प्रमाण सुमारे ०.०९८ घनमीटर असून त्याची अंदाजे किंमत २,२०० रुपये असल्याचे वन विभागाने सांगितले. जप्त केलेला मुद्देमाल यावल येथील मुख्य वनविभाग केंद्रात पावतीने जमा करण्यात आला असून, या प्रकरणी हरिपुरा पूर्व वन विभागाने प्राथमिक गुन्हा नोंद क्र. ३/२०२६ दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई सौरिष सहाय (उपवनसंरक्षक, यावल वन विभाग, जळगाव), समाधान पाटील (सहाय्यक वनसंरक्षक, यावल) आणि प्रशांत जोशी (वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पश्चिम) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत एस. बी. इंडे (वनपाल, हरिपुरा), श्रीमती एस. एस. भोंगरे (वनरक्षक, हरिपुरा पूर्व), श्रीमती सीमा भालेराव (वनरक्षक, हरिपुरा), योगेश मुंडे (वनरक्षक, हरिपुरा उत्तर), चेतन शेलार (वनरक्षक, निंबादेवी), सुधीर पटणे (वनरक्षक, नागादेवी) तसेच एस. एस. तडवी (वनमजूर) यांनी सहभाग घेतला.
वन विभागाने नागरिकांना अवैध वृक्षतोड, लाकूड साठवणूक अथवा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.



