अडावद – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धनोरा येथील महाजन विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये अडावद पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर क्राईम’ तसेच ‘मुलींची सुरक्षितता व कायदेशीर हक्क’ या विषयांवर विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, कार्यक्रमादरम्यान शाळा परिसरात संशयास्पदरीत्या रेंगाळत मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन टवाळखोरांवर पोलिसांनी तात्काळ धडक कायदेशीर कारवाई करत इतरांना कडक इशारा दिला.
दि. २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रकार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाईन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियाचा गैरवापर, अनोळखी लिंक, फेक कॉल्स आणि डिजिटल व्यवहारांमधील फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याविषयी पोलिसांनी उदाहरणांसह माहिती दिली.

मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘गुड टच – बॅड टच’, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO Act), महिला सुरक्षा कायदे तसेच कोणत्याही अनुचित प्रकाराला त्वरित विरोध करण्याची गरज यावर विशेष भर देण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी व विद्यार्थिनींनी ११२ या आपत्कालीन प्रतिसाद क्रमांकावर तसेच सायबर गुन्ह्यांसाठी १९३० या हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रम सुरू असतानाच पोलिसांनी शाळा परिसराची पाहणी केली असता मुलींची छेड काढण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरणारे दोन टवाळखोर आढळून आले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी, छेडछाड किंवा असभ्य वर्तन अजिबात सहन केले जाणार नसल्याचा स्पष्ट आणि कडक इशारा अडावद पोलिसांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमाला अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, महिला पोलीस कर्मचारी दिव्या मराठे तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. महाजन विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालकांनी आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे आणि कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अडावद पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.



