जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डिजिटल युगात मोबाईल, संगणक आणि विविध तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनाच्या सवयीवर परिणाम होत असताना, हस्ताक्षराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये ‘सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना’ हा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांच्या जीवनात आणि व्यक्तिमत्त्व विकासात हस्ताक्षराला महत्त्वाचे स्थान आहे. डिजिटल युगातही विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे अक्षर सुवाच्च, सुंदर आणि वळणदार व्हावे, तसेच शुद्ध लेखनाची सवय लागावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मार्गदर्शक आदर्श शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारण्यासाठी आवश्यक बाबींविषयी मार्गदर्शन केले. दोन शब्दांमधील योग्य अंतर कसे ठेवावे, लेखनाचा नियमित सराव कसा करावा, अक्षरांची ठेवण कशी असावी आणि अक्षर अधिक वळणदार व आकर्षक कसे करता येईल, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांना विविध उतारे देण्यात आले. विद्यार्थ्यांनी हे उतारे काळजीपूर्वक आणि सुंदर अक्षरात लिहून उपक्रमात सहभाग नोंदवला. लेखन करताना अक्षरांची उंची, शब्दांमधील अंतर, ओळींची मांडणी तसेच शुद्धलेखन याकडे विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखनाबाबत एक वेगळीच उत्सुकता आणि उत्साह पाहायला मिळाला.

‘सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ सुंदर अक्षराचे महत्त्व समजले नाही, तर नियमित लेखनाचा सराव, शिस्त आणि एकाग्रतेचे महत्त्वही अधोरेखित झाले. सुंदर आणि शुद्ध हस्ताक्षर हा विद्यार्थ्यांचा खरा दागिना असून, सुंदर हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढतो, असे मत शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. निकम यांनी व्यक्त केले. या उपक्रमात इयत्ता आठवीतील सर्व ५६ विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची एक नवीन ऊर्जा निर्माण झाल्याचे शिक्षकांनी सांगितले. डिजिटल साधनांचा वाढता वापर असतानाही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लेखनाची गोडी लावण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, ज्येष्ठ शिक्षक के. टी. चौधरी, के. पी. पाटील, जे. पी. धनगर, बी. के. गोरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आणि उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. पालकांनीदेखील शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्या लेखन कौशल्याला चालना देणारे आणि जुन्या लेखन संस्कृतीशी नाते जोडणारे असे उपक्रम शाळेत सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षाही पालकांनी व्यक्त केली.



