अडावद, ता. चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।अडावदवन विभागाच्या फिरत्या पथकाने पहाटेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत सागवानी लाकडाच्या अवैध वाहतुकीचा प्रयत्न हाणून पाडला. बोरमळी ते अडावद पाटचारी रस्त्यावर झालेल्या या कारवाईत वन विभागाने पाच विना नंबर मोटारसायकलींसह सागवानी अनघड बेलन असा एकूण १ लाख ६० हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईदरम्यान वन कर्मचाऱ्यांना पाहताच पाच संशयित लाकूड तस्कर मुद्देमाल व मोटारसायकली रस्त्याच्या कडेला टाकून पसार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ५ वाजता वनरक्षक आर. एस. निकुंभे यांना सागवानी लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वनपाल योगेश साळुंखे यांनी अडावद राऊंडच्या वन कर्मचाऱ्यांसह बोरमळी ते अडावद पाटचारी रस्त्यावर सामूहिक गस्त सुरू केली. गस्तीदरम्यान काही संशयित व्यक्ती विना नंबरच्या पाच मोटारसायकलींवरून सागवानी अनघड बेलनाची वाहतूक करताना वन पथकाच्या निदर्शनास आले. वन कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वन विभागाचे पथक जवळ येत असल्याचे लक्षात येताच संशयितांनी मोटारसायकली आणि लाकूड रस्त्याच्या कडेला टाकून घटनास्थळावरून पळ काढला. वन विभागाने तातडीने सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये दोन काळ्या रंगाच्या सीबी शाईन मोटारसायकली प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीच्या, एक तपकिरी रंगाची सीबी शाईन ३० हजार रुपये किमतीची, तसेच दोन काळ्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकली प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीच्या आहेत. या पाचही मोटारसायकलींची एकूण किंमत १ लाख ४० हजार रुपये असल्याचे वन विभागाने नमूद केले आहे. याशिवाय, विविध आकारांचे सागवानी अनघड बेलन एकूण १ हजार २५ नग जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत २० हजार ६२५ रुपये आहे. वाहनांसह सागवानी लाकडाचा असा एकूण १ लाख ६० हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल चोपडा येथील मुद्देमाल केंद्रात जमा करण्यात आला आहे.
या प्रकरणी वनरक्षक आर. एस. निकुंभे यांच्या कडील प्रकरण नोंद क्रमांक ०७/२०२६, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून पसार झालेल्या पाच संशयितांचा वन विभागाकडून शोध सुरू असून, जप्त करण्यात आलेल्या लाकडाचा स्रोत, तस्करीचे ठिकाण तसेच या प्रकरणामागील इतर व्यक्तींचा सहभाग याबाबत पुढील तपास वनपाल योगेश साळुंखे करीत आहेत. ही कारवाई उप वनसंरक्षक यावल वन विभाग सौरिष सहाय, सहाय्यक वनसंरक्षक चोपडा एम. बी. पाटील आणि वनक्षेत्रपाल अडावद प्रशांत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपाल योगेश साळुंखे, वनरक्षक राकेश निकुंभे, वनमजूर संजय बेलदार, प्रकाश सपकाळे, बापू कोळी, संजय तडवी, योगेश सपकाळे, राजेश जोशी, हर्षल जोशी, भिक्कन तडवी, इतबार तडवी आणि राजू पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.



