Home Cities जळगाव आधुनिक युगातही शिवकालीन करपल्लवी भाषेचे महत्त्व कायम ; जोगलखेडे वाडीतील लोककलावंतांनी जपला...

आधुनिक युगातही शिवकालीन करपल्लवी भाषेचे महत्त्व कायम ; जोगलखेडे वाडीतील लोककलावंतांनी जपला अनोखा सांकेतिक वारसा

0
29

रायपूर, ता. जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।- इंटरनेट, मोबाईल आणि संगणकाच्या आधुनिक युगात अनेक पारंपरिक कला आणि भाषा काळाच्या ओघात लुप्त होत असताना जळगाव जिल्ह्यातील काही लोककलावंतांनी मात्र शिवकालीन करपल्लवी भाषेची परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. हातांच्या बोटांच्या खुणा आणि विशिष्ट इशाऱ्यांच्या माध्यमातून संदेश, नावे व माहिती पोहोचविण्याची ही आगळीवेगळी सांकेतिक कला आजही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तचर यंत्रणेत करपल्लवी किंवा करपावली या सांकेतिक भाषेचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते. शत्रूच्या उपस्थितीत किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये बोलताना उघड शब्दांचा वापर न करता हातांच्या खुणा व इशाऱ्यांच्या माध्यमातून गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जात असे. त्यामुळे ही कला केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते.

गोंधळी, डंडिगन तसेच अन्य पारंपरिक लोककलावंतांनी ही सांकेतिक कला पिढ्यानपिढ्या जतन केली आहे. विदर्भातील काही भागांमध्ये तसेच विविध धार्मिक यात्रा आणि उत्सवांच्या ठिकाणी या कलेचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. माळेगाव यात्रेसारख्या ठिकाणी दात्याचे नाव अथवा एखादा संदेश विशिष्ट सांकेतिक पद्धतीने पोहोचविण्यासाठी करपल्लवी भाषेचा उपयोग केला जातो. जामनेर तालुक्यातील जोगलखेडे वाडी येथील संजय उत्तम शिंदे, आकाश कैलास शिंदे आणि प्रकाश विश्वनाथ शिंदे हे लोककलावंत आजही या परंपरेचा वारसा पुढे नेत आहेत. विविध तालुक्यांमध्ये गावोगावी फिरून ते करपल्लवी भाषेतील आपली कला सादर करतात. बोटांच्या इशाऱ्यांवरून व्यक्तीचे नाव ओळखणे आणि त्यानंतर वाजंत्रीच्या साथीने संबंधित व्यक्तीचे नाव आदराने घेणे, अशा अनोख्या सादरीकरणातून हे कलाकार उपस्थितांचे मनोरंजन करतात.

या कलेमध्ये हातांच्या बोटांच्या हालचाली आणि विशिष्ट खुणांना विशेष महत्त्व असते. कलाकारांच्या कौशल्यामुळे समोरच्या व्यक्तीचे नाव किंवा माहिती सांकेतिक पद्धतीने ओळखली जाते. त्यानंतर मिळणाऱ्या दक्षिणेतून हे कलाकार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. आधुनिक मनोरंजनाच्या साधनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असतानाही पारंपरिक कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.


Protected Content

Play sound