Home क्राईम सोलर सिस्टीम अनुदान प्रकरणात ₹२ हजारांची लाच घेताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या...

सोलर सिस्टीम अनुदान प्रकरणात ₹२ हजारांची लाच घेताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

0
10

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील सोलर सिस्टीम अनुदानाशी संबंधित काम करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. या कारवाईमुळे सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराविरोधातील एसीबीची आणखी एक मोठी कारवाई समोर आली असून, परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने सोलर सिस्टीम बसविण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार भुसावळ शहरातील दोन ठिकाणी सोलर सिस्टीमची खरेदी करून संबंधित महावितरण कंपनीकडे ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोलर सिस्टीम बसविण्यासाठी मंजुरी व रिलीज ऑर्डर काढण्याचे काम संबंधित अधिकाऱ्याकडे प्रलंबित होते. या प्रकरणात अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यू पाटील (वय ३१) यांनी प्रत्येक प्रकरणासाठी एक हजार रुपये, अशा दोन प्रकरणांसाठी एकूण दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना नितीन अभिमन्यू पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईनंतर त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली एसीबीच्या पथकाने पोउनि सुरेश पाटील, पोहेकॉ संगीता पवार, बाळू मराठे ही यशस्वी कारवाई पार पाडली.


Protected Content

Play sound