सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात चोरी, ५३ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील यश लॉन परिसरात राहणारे महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी गोपालसिंह भिंमसिंह राजपूत यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५३ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २५ एप्रिल रोजी उघडकीस आली असून, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपालसिंह राजपूत (वय ६८) हे त्यांच्या पत्नीसह यश लॉन परिसरात राहतात. ते १० एप्रिल रोजी उन्हाळी सुट्टीसाठी सोलापूर येथे त्यांच्या मुलीकडे गेले होते. २५ एप्रिल रोजी त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांचे घर उघडे दिसल्याने त्यांना माहिती दिली. राजपूत यांनी जळगावात परत येऊन शहर पोलिसांना याबाबत सांगितले.

चोरट्यांनी घरातून ३ ग्रॅम सोन्याचे मणी, ४ ग्रॅमची सोन्याची लहान मुलांची चैन, ९ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा तुकडा, चांदीच्या वाट्या, रेमंड कंपनीचे कापड, गाऊन आणि ५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५३ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. गोपालसिंह राजपूत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Protected Content