जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यात अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी दिपनगर, कु-हा, साकेगाव आणि किन्ही परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले. या मोहिमेदरम्यान गावठी दारू आणि दारू निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनासह एकूण १ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी आपली गोपनीय यंत्रणा सतर्क ठेवून अवैध दारू व्यवसायासंदर्भातील माहिती संकलित करावी आणि संबंधितांवर प्रभावी कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले होते.

या सूचनांनुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बीट व दुरक्षेत्रांमध्ये अवैध दारू व्यवसायाची माहिती गोळा करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दिपनगर दुरक्षेत्र, कु-हा दुरक्षेत्र, साकेगाव बीट आणि किन्ही परिसरात पोलिसांनी कारवाई केली. उपलब्ध माहितीनुसार, या मोहिमेत एकूण १० गुन्हे नोंदविण्यात आले असून, जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २६५ लिटर दारू आणि २ हजार ८०० लिटर गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन असल्याची नोंद आहे.
दिपनगर दुरक्षेत्रात पिंप्रीसेकम येथील अशोक धनसिंग तायडे (वय ५१) आणि फेकरी येथील वाल्मीक नगर परिसरातील रितेश प्रकाश सूर्यवंशी (वय २८) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या दोघांकडून प्रत्येकी २० लिटर दारू जप्त करण्यात आल्याची नोंद असून, प्रत्येक प्रकरणातील मुद्देमालाची किंमत २ हजार रुपये आहे. कु-हा दुरक्षेत्रात बेलव्हाय येथील निवृत्ती दगडू सोनवणे (वय ४५) आणि वराडसीम येथील विलास गोविंदा सपकाळे (वय ५८) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणांमध्ये अनुक्रमे ३० आणि १५ लिटर दारू जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत अनुक्रमे ३ हजार आणि १ हजार ५०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. साकेगाव बीटमध्येही पोलिसांनी कारवाई करत साकेगाव येथील सागर मधुकर सोनवणे (वय ३०), भगवान भिमराव कोळी (वय ३८) आणि केशव माधव मराठे (वय ५०) यांच्याविरुद्ध कारवाई केली. या तिन्ही प्रकरणांमध्ये प्रत्येकी ३० लिटर दारू जप्त करण्यात आली असून, प्रत्येक प्रकरणातील मुद्देमालाची किंमत ३ हजार रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
किन्ही परिसरातील कारवाईत कन्हाळा येथील उस्मान हसन गवळी (वय ४९), खलील हसन गवळी (वय ३९) आणि युनुस हसन गवळी (वय ४३) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणांमध्ये प्रत्येकी ३० लिटर दारू जप्त करण्यात आली. याशिवाय अनुक्रमे ८००, १ हजार ६०० आणि ४०० लिटर गावठी दारू निर्मितीचे रसायन जप्त केल्याची नोंद आहे. या तिन्ही प्रकरणांतील मुद्देमालाची किंमत अनुक्रमे ४३ हजार, ८३ हजार आणि २३ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेत दारूविक्रीसह गावठी दारू निर्मितीशी संबंधित बाबींवरही लक्ष केंद्रित करण्यात आले. अवैध दारू व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत आणि अशा व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण ठेवता यावे, या उद्देशाने जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार वाल्मिक सोनवणे, सुभान तडवी, विकास बाविस्कर, सुधीर विसपुते, ईस्तीयाक शेख, हेमंत मिटकर, रशीद तडवी, सुभाष सोनवणे, सचिन पारधी, न्यायाजोद्दीन तडवी, किरण तायडे, जगदीश भोई आणि महिला पोलीस कर्मचारी लिना लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कुठेही अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांकडे असल्यास त्यांनी ती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



