

मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७३/२०२३ नुसार या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. या खटल्याचे सत्र प्रकरण क्रमांक ५०/२०२४ असे होते. गायमाता मंदिराच्या यात्रेनिमित्त मुडी प्र. डांगरी येथे आयोजित लोकनाट्य आणि यात्रेदरम्यान पोलीस कर्मचारी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत होते. यावेळी पोलीस हवालदार भरत श्रीराम ईशी आणि त्यांचे सहकारी भरत गायकवाड कर्तव्यावर असताना आरोपी प्रदीप शिरसाठ याने त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
आरोपीने फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली, तसेच ‘तुझा काटा काढतो’ अशी धमकी दिल्याचा आरोप होता. शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये दोषारोप दाखल करण्यात आले होते.
या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश-२ श्रीमती एम. के. एस. कोचर यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲड. के. आर. बागुल यांनी बाजू मांडली. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. फिर्यादी आणि साक्षीदारांच्या साक्षींसह पोलीस पाटील, घटनास्थळी उपस्थित असलेले सहकारी तसेच इतर परिस्थितीजन्य पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
या प्रकरणाच्या कामकाजात मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भरत श्रीराम ईशी, अमळनेर पोलीस ठाण्याचे केस वॉच व पैरवी अधिकारी पोलीस हवालदार पुरुषोत्तम वाल्डे, पारोळा पोलीस ठाण्याचे पीएसआय उदयसिंग साळुंखे, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल रणधीर, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद पाटील आणि अडावद पोलीस ठाण्याचे जीपीएसआय दिलीप थोरे यांनी सहकार्य केले.



