रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मंगरूळ धरणातून परवानगीने शेतीसाठी गाळ काढण्याच्या कामात जेसीबी मशीनद्वारे गाळ काढल्याचा मोबदला म्हणून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रावेर वनपरिक्षेत्रातील वनरक्षकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रावेर ते बऱ्हाणपूर रोडवरील एका ज्यूस सेंटर येथे बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
जगदीश काशिनाथ जगदाळे, वय २७ वर्षे, वनरक्षक, रावेर वनपरिक्षेत्र असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणातील ४० वर्षीय तक्रारदाराचा रावेर येथे अर्थमुव्हर्स एजन्सीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे जेसीबी मशीन आहे. तक्रारदाराच्या परिचित व्यक्तीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावे रावेर येथील मंगरूळ धरणातून शेतीकामासाठी गाळ वाहतूक करण्याची परवानगी पाटबंधारे उपविभाग, रावेर कार्यालयाकडून घेतली होती.

गाळ काढण्याचे ठिकाण वनरक्षक जगदीश काशिनाथ जगदाळे यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने, तक्रारदाराने जेसीबी मशीनद्वारे गाळ काढल्याच्या मोबदल्यात २० हजार रुपये, तर त्यांच्या परिचित व्यक्तीने ट्रॅक्टरद्वारे गाळाची वाहतूक केल्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपये, अशी एकूण ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार २८ ऑक्टोबर रोजी जळगाव एसीबीकडे करण्यात आली होती.
त्यानंतर एसीबीच्या पथकाने रावेर शहरातील छोरिया मार्केटमधील एका दुकानात पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत जगदाळे यांनी जेसीबी मशीनद्वारे गाळ काढल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. रावेर ते बऱ्हाणपूर रोडवरील ज्यूस सेंटर येथे तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना वनरक्षक जगदीश काशिनाथ जगदाळे यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.



