Home Cities जळगाव खान्देशचा आवाज काश्मीरच्या नंदनवनात गुंजणार! राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलनाच्या प्रमुख निवेदकपदी तुषार...

खान्देशचा आवाज काश्मीरच्या नंदनवनात गुंजणार! राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलनाच्या प्रमुख निवेदकपदी तुषार वाघुळदे

0
13


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्यात होणाऱ्या ऐतिहासिक ‘पहिले राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलन २०२६’मध्ये महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी बाब समोर आली आहे. या राष्ट्रीय स्तरावरील भव्य संमेलनाच्या प्रमुख निवेदक तथा सूत्रसंचालकपदी उत्तर महाराष्ट्रातील नामवंत अँकर व कलावंत तुषार वाघुळदे (जळगाव) यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता खान्देशचा दमदार आवाज थेट काश्मीरच्या नंदनवनात गुंजणार असून, त्यांच्या निवडीचे संगीत आणि कला क्षेत्रातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

काश्मीरमध्ये २ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत या पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र चित्रपट कलाकार असोसिएशनकडून तुषार वाघुळदे यांची या संमेलनाच्या प्रमुख निवेदकपदी निवड करण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्रातील डायरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स यांच्याशी संबंधित या संघटनेने राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी वाघुळदे यांच्यावर सोपवल्याने खान्देशसह महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. देशभरातील कराओके गायक-गायिका आणि संगीतप्रेमींना हक्काचे राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारतातील विविध राज्यांमधून शेकडो प्रतिभावान कराओके गायक-गायिका, संगीतकार तसेच संगीत आणि कला क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. देशभरातील कलाकारांना एकत्र आणणारे हे पहिलेच राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलन असल्याने संगीत क्षेत्रात या सोहळ्याविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

एवढ्या मोठ्या राष्ट्रीय व्यासपीठावरील कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रसंचालनाची धुरा सांभाळण्यासाठी महाराष्ट्रातून तुषार वाघुळदे यांची निवड झाल्याने त्यांच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. वाघुळदे हे मराठी फिल्म्स चेंबर्स ऑफ कॉमर्स, कोल्हापूरचे माजी सचिव असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी सदस्य आहेत. सध्या ते इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध ‘ऑर्केस्ट्रा 7 स्ट्रिंग्स’चे ते संचालक आणि ऑर्गनायझर म्हणूनही कार्यरत आहेत. आपल्या दमदार आवाजासह बहारदार निवेदनशैली, उत्कृष्ट संवादकौशल्य, समयसूचकता आणि हजरजबाबीपणाच्या जोरावर तुषार वाघुळदे यांनी यापूर्वी विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचे यशस्वी सूत्रसंचालन केले आहे. उत्कृष्ट निवेदक म्हणून त्यांनी महाराष्ट्रासह देशातील विविध शहरांमध्ये आपल्या सूत्रसंचालनाची छाप सोडली आहे.

नवी मुंबई, पनवेल, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, अकोला आणि धुळे यांसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. याशिवाय बऱ्हाणपूर, खंडवा, इंदूर, भोपाळ, इटारसी (मध्य प्रदेश), चितोडगड, कोटा (राजस्थान), सहारनपूर तसेच विजयवाडा (आंध्र प्रदेश) अशा विविध ठिकाणीही त्यांनी आपल्या निवेदनशैलीने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. संगीत क्षेत्राची उत्तम जाण, रंगमंचावरील प्रभावी उपस्थिती आणि प्रेक्षकांना कार्यक्रमाशी जोडून ठेवण्याची हातोटी लक्षात घेऊनच राष्ट्रीय संमेलनाच्या प्रमुख सूत्रसंचालकपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विशेषतः देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या कलाकारांसमोर महाराष्ट्र आणि खान्देशचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यामुळे वाघुळदे यांच्या या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना तुषार वाघुळदे म्हणाले, “काश्मीरसारख्या विहंगम, निसर्गरम्य आणि नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीवर होणाऱ्या पहिल्या ऐतिहासिक राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलनाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. या राष्ट्रीय मंचावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना मला अत्यंत आनंद होत असून उर अभिमानाने भरून आला आहे. हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी मी माझे सर्वोत्तम योगदान देईन आणि महाराष्ट्र व खान्देशच्या लौकिकात मोलाची भर घालण्याचा प्रयत्न करेन.” तुषार वाघुळदे यांच्या निवडीनंतर राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, संगीत क्षेत्रातील कलाकार, इव्हेंट ऑर्गनायझर्स, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काश्मीरमधील या राष्ट्रीय संमेलनासाठी तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Protected Content

Play sound