Home आरोग्य सेवा संकल्प अभियानातून जळगाव जिल्ह्यात आरोग्यसेवेचा विस्तार ; विविध शिबिरांत ७१० नागरिकांची...

सेवा संकल्प अभियानातून जळगाव जिल्ह्यात आरोग्यसेवेचा विस्तार ; विविध शिबिरांत ७१० नागरिकांची तपासणी

0
17

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय आयुर्वेद रुग्णालय, जळगाव यांच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसह विविध भागांतील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विविध ठिकाणी आयोजित शिबिरांचा एकूण ७१० लाभार्थींनी लाभ घेतला.

अभियानांतर्गत जळगाव येथील बेघर निवारा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांनुसार आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचार देण्यात आले. या विशेष शिबिराचा एकूण ४१ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. याशिवाय जामनेर तालुक्यातील काळखेडा आणि जळगाव शहरातील कांचन नगर येथे १८, १९, २० आणि २१ सप्टेंबर रोजी आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांना नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला असून चार दिवसांत एकूण ३७५ लाभार्थींनी आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला.

शासकीय आयुर्वेद रुग्णालय, जळगाव येथेही सेवा संकल्प अभियानांतर्गत सलग आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिरे घेण्यात आली. २२ सप्टेंबर रोजी आयोजित शिबिरात ९८ लाभार्थी सहभागी झाले. त्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचार करण्यात आले. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी आयोजित आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचा ८८ लाभार्थींनी लाभ घेतला. २४ सप्टेंबर रोजीही शासकीय आयुर्वेद रुग्णालयात अशाच प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात १०८ लाभार्थी सहभागी झाले. अशा प्रकारे रुग्णालयात २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान आयोजित तीन शिबिरांचा एकूण २९४ नागरिकांनी लाभ घेतला.

बेघर निवारा केंद्रातील ४१ ज्येष्ठ नागरिक, काळखेडा व कांचन नगर येथील ३७५ लाभार्थी आणि शासकीय आयुर्वेद रुग्णालयातील तीन शिबिरांतील २९४ लाभार्थी अशा एकूण ७१० नागरिकांपर्यंत या आरोग्य उपक्रमाचा लाभ पोहोचला. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत वैद्यकीय सल्ला देण्यात आला. आवश्यकतेनुसार उपचारही करण्यात आल्याने विविध भागांतील नागरिकांना एकाच ठिकाणी तपासणी, मार्गदर्शन आणि उपचाराची सुविधा मिळाली.


Protected Content

Play sound