Home Cities जळगाव जळगावातील कृषी उद्योजक व निर्यातदारांसाठी ३० सप्टेंबरला ऑनलाइन वेबिनार 

जळगावातील कृषी उद्योजक व निर्यातदारांसाठी ३० सप्टेंबरला ऑनलाइन वेबिनार 

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कृषी उद्योजक, निर्यातदार तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) यांच्यासाठी बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (DGFT), मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त आवाहनातून हा वेबिनार आयोजित करण्यात आला असून, कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांना उपलब्ध असलेल्या निर्यात संधींबाबत सहभागी उद्योजकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

“ए-पी-ई-डी-एज रोल इन एक्सपोर्ट प्रमोशन ऑफ ॲग्री अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स” या विषयावर हा वेबिनार होणार आहे. कृषी उत्पादनांसह प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध संधी, निर्यातविषयक प्रक्रिया आणि संबंधित बाबींची माहिती या माध्यमातून देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात केळी, कृषीमाल तसेच विविध अन्नप्रक्रिया उद्योगांशी संबंधित उद्योजक मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. अशा उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी समजून घेण्यासाठी आणि निर्यात क्षेत्रातील आवश्यक बाबींची माहिती मिळवण्यासाठी हा वेबिनार उपयुक्त ठरणार आहे. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक कृषी उद्योजक, निर्यातदार आणि MSME उद्योजकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी आयोजकांकडून ऑनलाइन नोंदणी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी दिलेल्या लिंकवर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी.

वेबिनार बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सहभागी होण्यासाठी Webex Meeting Number 2642 777 0379 असून, Meeting Password DGFT@2026 असे आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कृषी उद्योजक, निर्यातदार आणि MSME उद्योजकांनी या ऑनलाइन वेबिनारमध्ये सहभागी होऊन कृषी व प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीसंदर्भातील माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound