Home Cities जळगाव गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ‘बालदिन’ व जयंती उत्साहात साजरी

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ‘बालदिन’ व जयंती उत्साहात साजरी

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (गोदावरी आयएमआर) महाविद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या जडणघडणीत आणि आधुनिक भारताच्या उभारणीत पंडित नेहरूंनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आजचा विकसित भारत उभा राहिला आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी यावेळी केले. बालदिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत वारके यांनी पंडित नेहरूंच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. स्वातंत्र्यानंतर आधुनिक आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी पंडित नेहरू यांनी अत्यंत दूरदृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. देशात आयआयटी (IIT), एम्स (AIIMS) यांसारख्या उच्चस्तरीय शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांच्या उभारणीसह भाक्रा नांगलसारख्या महाप्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या विकासाचा पाया अतिशय मजबूत केला, असे त्यांनी नमूद केले.
देशाच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि पायाभूत विकासासाठी पंडित नेहरूंनी नेहमीच नियोजनबद्ध प्रयत्न केले. त्या काळात आजच्यासारखी दळणवळणाची आधुनिक साधने, मोबाईल, इंटरनेट आणि प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही त्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भक्कम पायाभरणी केली. देशाच्या प्रगतीसाठी आणि जनहितासाठी त्यांनी आपल्या वैयक्तिक सुखाचा व संपत्तीचाही त्याग केला, असे सांगत त्यांच्या महान कार्याचे विस्मरण होऊ नये, असे विचार डॉ. वारके यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. आरती वर्मा यांनी देखील आपल्या मनोगतातून पंडित नेहरू यांच्या देशाच्या जडणघडणीतील योगदानावर प्रकाश टाकला. तसेच मुलांवरील त्यांचे अफाट प्रेम, शिक्षणाविषयीची त्यांची गाढ बांधिलकी आणि शिक्षणाच्या माध्यमातून समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा त्यांनी दिलेला संदेश यावर त्यांनी सविस्तर विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता चौधरी यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडले. पंडित नेहरू यांच्या विचारांचे स्मरण आणि त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला त्रिवार अभिवादन करत या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली.
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी आधुनिक भारताच्या उभारणीत आणि शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत नेहरूंच्या दूरदृष्टीचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले.

Protected Content

Play sound