Home आरोग्य रॅगिंगच्या नावाखाली छळ केल्यास कारवाई अटळ; डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाचा कडक संदेश

रॅगिंगच्या नावाखाली छळ केल्यास कारवाई अटळ; डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाचा कडक संदेश

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा छळ रोखण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित व निकोप शैक्षणिक वातावरण मिळवून देण्यासाठी रॅगिंग प्रतिबंधात्मक कायदा अत्यंत कठोरपणे अंमलात आला आहे. रॅगिंग करणे हा कायद्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, असा स्पष्ट इशारा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी दिला आहे. महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित रॅगिंग प्रतिबंधात्मक संयुक्त सभेत ते मार्गदर्शन करत होते.
या महत्त्वाच्या संयुक्त सभेच्या सुरुवातीला प्रा. डॉ. बापुराव बिटे यांनी रॅगिंग या अयोग्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती देत त्याचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक जीवनावर होणारे घातक परिणाम यावर सखोल प्रकाश टाकला. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी वागताना नेहमी आदराची भावना ठेवली पाहिजे, असे सांगितले. महाविद्यालयाच्या परिसरात कोणत्याही परिस्थितीत रॅगिंग खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत रॅगिंगमुळे कायदेशीर कारवाईसह विद्यार्थ्यांचे भविष्य कसे धोक्यात येऊ शकते, याची जाणीव त्यांनी उपस्थितांना करून दिली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी देखील विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधाविषयी मोलाची माहिती दिली आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर हा पूर्णपणे ‘रॅगिंग मुक्त परिसर’ असल्याचे ठामपणे सांगितले. सभेदरम्यान उपस्थितांनी रॅगिंग न करण्याबाबत आणि कॅम्पसमध्ये सुरक्षित वातावरण राखण्याबाबत रॅगिंग प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. माया आर्विकर, डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. सी. डी. सारंग, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, सुरेंद्र गावंडे, कांचन रोटे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी स्वराज सुर्या, सिद्दीका मुस्कान आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला असून, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील लिपिक व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रॅगिंग प्रतिबंधात्मक संयुक्त सभा पार पडली. रॅगिंग करणे हा गंभीर व आयुष्य उद्ध्वस्त करणारा गुन्हा असल्याचे सांगत अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी विद्यार्थ्यांना कठोर संदेश दिला असून, कॅम्पस रॅगिंगमुक्त ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली आहे.

Protected Content

Play sound