जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील चैतन्य मेडीकल परिसरात बाजार खरेदी करण्यासाठी आलेल्या एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिध्दार्थ एकनाथ साळुंखे (वय-६३) रा. खोटे नगर जळगाव हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. शुक्रवार २० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते कामाच्या निमित्ताने जळगावातील चैतन्य मेडीकल जवळ दुचाकी (एमएच १९ सीटी १८२३) ने आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी मेडीकलच्या समोर पार्क करून लावली होती. दरम्यान, त्यांची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांच्या दुचाकीचा शोध परिसरात घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.