महिनाभरापासून मनसेत हुकुमशाही : वसंत मोरेंचे टिकास्त्र

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसेमध्ये महिन्यापासून हुकुमशाही सुरू असून झारीतील शुक्राचार्याने दूर करण्याची गरज असल्याचे सांगत पक्षाचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी खळबळ उडवून दिली आहे. राज यांच्या सभेआधीच त्यांनी टिका केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, राज ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर अनेक पदाधिकारी अस्वस्थ झाले. यात पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची देखील नाराजी दिसून आली. वसंत मोरेंना तडकाफडकी पुणे शहर अध्यक्षपदावरून बाजूला सारून साईनाथ बाबर यांच्यावर ती जबाबदारी सोपवली. तसेच, वसंत मोरेंना शिवतीर्थवर बोलावून राज ठाकरेंनी त्यांच्याशी चर्चा देखील केली. यामुळे त्यांनी पक्षाशी जुळवून घेतल्याचे दिसून आले होते. मात्र आज राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेआधीच त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आज पुण्यात राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना टिकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, मला राज ठाकरेंनी याबाबत विचारणा केली, तर मी त्यांना सांगेन. कारण संयम तुटण्याची वेळ कधीकधी येते. माझ्यापर्यंत विषय होता, तेव्हा मी सगळ्या गोष्टी रेटून नेत होतो. पण आज माझ्या कार्यकर्त्यांपर्यंत विषय आला आहे. मला वाटतं पदाधिकारी हा पदाधिकारी असतो. तो कधीच कुणाचा नसतो. तुम्ही त्याला व्यवस्थित वागणूक दिली, तर तो तुमच्यासोबतच असतो. इथे वसंत मोरे किंवा अजून कुणाचा ग्रुप नाही. तो पक्षाचा ग्रुप आहे. राज ठाकरेंना मानणारा ग्रुप आहे. पक्षात मतभेद असतात. पण आता मतभेद कुठेतरी मनभेदापर्यंत जायला लागले आहेत. ते जाऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करतोय. पण वेगवेगळ्या माध्यमातून हे दाखवलं जातंय की आम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

मोरे पुढे म्हणाले की, मी काल पक्षाच्या सर्व नेत्यांना रात्री माझं फेसबुक लाईव्ह टॅग केलं आहे. एखाद्या चॅनलवर दाखवलं, म्हणून त्याची कोणतीही सत्यता न पडताळता निलेश माझिरेंवर जी कारवाई केली, नंतर त्यांना जी वागणूक दिली की तू पक्षात राहणार आहेस का वगैरे. अशा पद्धतीने आजपर्यंत पक्षात कुणी बोलत नव्हतं. गेल्या महिन्याभरात पक्षात हुकुमशाहीचा प्रकार सुरू आहे. कुणालातरी शहरावर वेगळ्या पद्धतीने वट बसवायचा आहे. तो कामातून त्यांनी बसवावा. अशा कारवाया करून कार्यकर्ते तुटतील, असा दावा त्यांनी यावेळी केला.

या गोष्टी राज ठाकरेंपर्यंत गेल्याच नसतील. त्यांना इथे काय चाललंय ते माहितीच नसेल. मी याबाबत पुण्यातील पक्षाच्या नेत्यांच्या कानावर गोष्टी घालतोय. गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून मला सांगायला लागतंय की मी मनसेत आहे. हे झारीतले शुक्राचार्य शोधले पाहिजेत. त्यांच्यावर कारवाया व्हायला पाहिजेत. कोण पक्षातून कुणाला बाहेर घालवायला बघतंय त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

Protected Content