सर्वोच्च न्यायालयाने ‘रिपब्लिक’ची याचिका फेटाळली

नवी दिल्ली- टीआरपी घोटाळ्यातआपल्या कर्मचाऱ्यांना अटक करू नये म्हणून रिपब्लिक चॅनेलची मालकी असणाऱ्या एआरजी आउटलायर या कंपनीने केलेली याचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावली.

या चॅनेलविरोधात असणारे सारे गुन्हे वगळावे अथवा त्यांना सीबीआयकडे वर्ग करावे, अशीही मागणी या याचिकेद्वारे केली होती. तसेच या चॅनेल विरोधात दाखल केलेल्या अनेक खटल्यांमध्ये राज्य सरकार आणि पोलिसांची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणीही केली होती.

मुळात ही याचिका महत्वाकांक्षी स्वरूपाची आहे. महाराष्ट्र पोलिसांनी कोणालाही अटक करू नये आणि हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी तुमची इच्छा आहे. ही याचिका तुम्ही मागे घेतलेली बरी, अशा शब्दात न्या. डी. वाय. चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे वकील मिलिंद साठे यांना सुनावले.

साठे यांनी युक्तीवाद केला की, रिपब्लिक मिडिया नेटवर्क आणि त्यांचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांना महाराष्ट्र पोलिसांनी घाबरवू नये, यासाठी ही याचिका केली आहे. त्यावर खंडपीठाने स्पष्ट केले की, तुम्हाला सर्व प्रकारची सुटका हवी आहे, ती सर्व एका याचिकेत मिळू शकत नाही. त्यामुळे योग्य कायदेशीर मार्गाचा अवलंब आपण करू शकता.

 

Protected Content