राज्यभरातील कलावंतांचा उद्या चैत्यभूमिवर जागर

मुंबई । कोरोनामुळे प्रचंड अडचणीत आलेले राज्यातील कलावंत चैत्यभूमिवर १६ सप्टेबर रोजी जागराच्या माध्यमातून आंदोलन करणार आहेत.

कोरोना संकटाच्या काळात कार्यक्रम बंद झाल्याने लाखो लोककलावंत, तंत्रज्ञ, निर्माते यांचा रोजगार हिरावला गेला आहे. कलाक्षेत्र मोठ्या अडचणीत सापडले आहे. यामुळे कलावंतांमध्ये अस्वस्थतेची भावना असून ते १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता चैत्यभूमी दादर येथे एल्गार करणार आहेत. फेडरेशन ऑफ आर्टिस्ट असोसिएशन या संस्थेतर्फे हा जागर केला जाणार असून त्यामध्ये राज्यभरातील २०० संस्था सहभागी होणार आहेत.

अनलॉकच्या टप्प्यात उद्योगधंदे, शासकीय आणि खासगी कार्यालये टप्प्याटप्प्याने सुरक्षेचे नियम आणि अटीशर्थी घालून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र कलाक्षेत्राशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यास अद्याप परवानगी नाही. त्यामुळे कलावंतांचे मार्च ते सप्टेंबर या कालावधीत मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर साठवलेली पुंजी वापरून, घरातील मौल्यवान वस्तू विकून, कर्ज घेऊन उदरनिर्वाह करण्याची वेळ आली असल्याची माहिती फेडरेशन ऑफ आर्टिस्ट असोसिएशनने दिली.

या अनुषंगाने चैत्यभूमिवर राज्यभरातील कलावंत आपला आवाज केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्र आल्या आहेत. यामध्ये गायक, वादक, कव्वाल, लोककलावंत, ढोलपथक, बँडपथक, निवेदक, नकलाकार, इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिक, डोअरकीपर्स, कॅटरींग व्यावसासियक, मेकअपमॅन, केशभूषाकार, तंत्रज्ञ, निर्माते यांच्या विविध २०० संघटनांचा समावेश आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून बुधवारी जागर करणार असल्याचे असोसिएशनने पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मेघा घाडगे, संतोष परब, मनोज संसारे, सुभाष जाधव, अमिता कदम, हरिश शिवलकर, ज्युनियर अनिल कपूर, आरीफ जी. शाहीर मधू खामकर, किशोर म्हात्रे आदी कलाकार उपस्थित होते.

Protected Content