शंतनू शिंदेचा जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या उपक्रमात सहभाग

 

 

भडगाव : प्रतिनिधी । १०० उपग्रह एकाच वेळी अवकाशात हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित करण्याच्या आणि जागतिक विक्रम ठरलेल्या उपक्रमात येथील शंतनू शिंदे या  विद्यार्थ्यांचा सहभाग जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा ठरला आहे

 

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड चॅलेंज २०२१ अंतर्गत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या प्रकल्पामध्ये सात फेब्रुवारीला भारतातील १००० विद्यार्थ्यांनी १०० उपग्रह एकाच वेळी अवकाशात हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित करून विश्वविक्रम, आशियाई विक्रम, भारतीय विक्रम, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड विक्रम  स्थापित करण्याचा मान मिळवला यात  शंतनू कमलेश शिंदे याने सहभाग नोंदवला यामुळे त्याला विविध  विक्रम करणाऱ्या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल जागतिक विक्रमाची नोंद घेणाऱ्या संस्थांकडून नुकतीच सन्मानपत्रे प्राप्त झाली.

 

. या  उपक्रमात  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ३९ उपग्रहाची बांधणी केली.  उपग्रहाचे प्रक्षेपण तामिळनाडू येथील रामेश्वरम् येथून करण्यात आले. जगातील सर्वात कमी वजनाचे म्हणजे २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम वजनाचे हे उपग्रह भारतीय विद्यार्थ्यांनी  बनवून प्रक्षेपीत केल्याने हे सर्व विक्रमाचे मानकरी ठरले आहेत.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सॅटेलाईट मेकींग कार्यशाळा नागपुर व पुणे येथे घेण्यात आली. यात पुणे येथील कार्यशाळेत  शंतनू शिंदे याने प्रत्यक्ष सहभाग नोंदवून उपग्रहाची बांधणी केली. तदनंतर  उपग्रह इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने तामिळनाडू येथील रामेश्वरम् येथून प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपणस्थळी इस्रो प्रमुख शास्रज्ञांसह डॉ. ऐ.पी.जे अब्दुल कलाम यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. या उपग्रहाद्वारे पृथ्वीवर असलेल्या केंद्राशी कसा संपर्क येतो, वातावरणातील ओझोन वायुच्या थराचा  बियाणे , हवेतील वातावरणाचा अभ्यास  व  वातावरणातील महत्वपूर्ण बदलांची सुक्ष्म विश्लेषणपर माहिती उपग्रहाद्वारे मिळण्यास सुरूवात झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

 

 

सदर उपक्रमात पहिल्यांदाच अत्यंत कमी वजनाच्या व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी तयार  केलेल्या  उपग्रहांचे एकाच वेळी यशस्वी प्रक्षेपण केल्यामुळे तो जागतिक विक्रम ठरला. शंतनू शिंदेला World Books of Record, Guinness World Record, Assist World Record, India Books of Record, Asia Books of Record हे जागतिक विक्रम नोंदवल्यामुळे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलेले आहे.

 

 

शंतनू हा भडगाव येथील लाडकूबाई प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे व नागद केंद्रातील उपशिक्षिका सौ.योगिता शिंदे यांचा मुलगा  आहे. त्याला या उपक्रमात राज्य समन्वयक श्रीमती.मनीषा चौधरी, उपक्रमाचे प्रमुख सल्लागार मिलींद चौधरी, स्नेहदिपचे गोकुळ चौधरी, सुशांत जगताप, पोदार शाळेच्या प्राचार्या श्रीमती लता उपाध्याय ,शाळेतील सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या जागतिक विक्रमातील सहभागाबद्दल किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, सचिव डॉ.पुनम पाटील, संचालक प्रशांत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

 

Protected Content